चिखली नदीच्या बंधाऱ्यात पोहण्यास गेलेल्या बालकाचा बुडून मृत्यू

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील गडखांब नगावच्या मध्यभागांतून जाणाऱ्या चिखली नदीच्या आश्रम शाळेच्या मागील बंधाऱ्यात गडखांब येथील तेरा वर्षाच्या बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवार दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.

स्थानिक प्राप्त माहितीनुसार, “गडखांब येथे राहणारा व गावातील आश्रमशाळेतला इयत्ता सातवी वर्गाचा विद्यार्थी अमित घुबड्या सोळंखे (वय-१३ वर्ष) हा गुरुवार रोजी शाळेत जातो म्हणून मित्रांसोबत घरातून निघाला आणि आश्रमशाळेच्या मागील बाजूस असलेल्या चिखली नदीच्या बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेला. पोहता पोहता तो बुडाला.

तो शाळेतून न आल्याने पालकाने त्याचा सर्वत्र शोध घेतला पण तो कुठंही आढळून आला नाही. शुक्रवार रोजी नदी परिसरात शोध घेतला असता त्याचा मृतदेह नदीच्या बंधाऱ्याजवळ दिसून आला. त्याचा मृतदेह बघून कुटुंबाने हंबरडा फोडला. आई-वडील गडखांब येथे मोलमजुरीसाठी वास्तव्यास होते. अमित हा आश्रमशाळेत इयत्ता सातवी वर्गात शिकण्यास होता. तो गावातून च ये – जा करीत असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान अमित सोळंखी याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात देण्यात आला. घुबड्या सोळंकी यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमितच्या दुदैवी घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

Protected Content