मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने अशोक चव्हाण यांच्यासह तिघांना उमेदवारी जाहीर केली आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि केंद्रीय राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या राज्यसभेतील जागा रिक्त होत असून त्यांच्या जागी आज भाजपने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर कालच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. यावर शिक्कामोर्तब झाले असून त्यांना वरिष्ठ सभागृहाचे सदस्यत्व मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मेधा कुलकर्णी या कोथरूडच्या माजी आमदार असून त्यांच्या जागी चंद्रकांत पाटील यांना २०१९ साली तिकिट मिळाल्याने त्या नाराज होत्या. आता राज्यसभेच्या माध्यमातून त्यांची नाराजी दूर करण्यात आली आहे. तर, डॉ. अजित गोपछडे हे भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष असून त्यांना देखील राज्यसभेची संधी मिळाली आहे.
आधीच चंद्रकांत हंडोरे यांना कॉंग्रेसने उमेदवारी जाहीर केली असली तरी अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.