भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ शहरातील श्रीहरी नगरात बांधकाम करणाऱ्या मिस्तरीचे बंद घर फोडून ९ लाख ९० हजारांची रोकड लांबविल्याची घटना रविवारी ७ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास समोर आले आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात रात्री ९ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, मुकेशकुमार राधाकिशन कुमावत वय-४५ रा. श्रीहरी नगर, भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बांधकाम मिस्तरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत असतात. रविवारी ७ जानेवारी रोजी दुपारी त्यांचे घर बंद होते, याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातील बेडमध्ये ठेवलेले ९ लाख ९० हजारांची रोकड काढून चोरून नेले. हा प्रकार दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास उघडकीला आला. घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुकेशकुमार कुमावत यांनी तातडीने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात रात्री साडेनऊ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव हे करीत आहे.