जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वडिलोपार्जीत जमिनीच्या भूसंपादनाची वाढीव भरपाई मिळण्याच्या प्रकरणात जळगाव जिल्हा न्यायालयात खोटे शपथपत्र व दस्तऐवज सादर करून १ कोटी २५ लाख ४० हजार ३९३ रुपये प्राप्त केल्याचा प्रकार समोर आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही ही रक्कम भरली जात नसल्याने चाळीसगाव तालुक्यातील करगाव येथील १३ जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील करगाव येथील शेतकरी तात्या गणपत चव्हाण (वय-२५) यांच्या गावात असलेल्या वडिलोपार्जीत जमीनीचे भूसंपादन झाल्याने त्याच्या वाढीव नुकसान भरपाईसाठी जळगाव न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. यातील तात्या चव्हाण व इतर लाभार्थी वारसांना लाभ मिळू नये, यासाठी १३ जणांनी न्यायलयात खोटे शपथपत्र व दस्तऐवज सादर केले. त्यातून भूसंपादनाची वाढीव नुकसान भरपाईचे १ कोटी २५ लाख ४० हजार ३९३ रुपये प्राप्त केले. ही रक्कम भरण्याविषयी न्यायलयाने आदेश दिले, तरीदेखील सदर रक्कम भरली जात नसल्याची फिर्याद तात्या चव्हाण यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून शुक्रवारी ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता चाळीसगाव तालुक्यातील करगाव येथील ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि रवींद्र बागूल करत आहेत.