पुण्याच्या बुधवार पेठेत वस्तऱ्याने हत्या

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बुधवार पेठेतील क्रांती चौकात वस्तऱ्याने एकाचा खून केल्याची घटना शुक्रवारी (ता. ९) संध्याकाळी घडली. खून करून पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानक परिसरात अटक केली आहे.

नईम शेख असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कलाम ऊर्फ रुबेल शेख याला अटक केली. याबाबत एका महिलेने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत राहायला आहे. आरोपी कलाम शेख बरोबर तिचे लग्न झालेले होते. फिर्यादी महिलेने सहा महिन्यांपूर्वी नईम शेख याच्याशी विवाह केला होता.

दोघे जण एकत्र राहत होते. पत्नीने दुसरा विवाह केल्याने कलाम चिडला होता. त्यामुळे तो नईमच्या पाळतीवर होता. शुक्रवारी सायंकाळी नईम हा बुधवार पेठेतील क्रांती चौकात सागर इमारतीजवळ थांबला होता. त्यानंतर काही वेळानंतर नईम तेथे आला. नईम येथे येताच कलामने खिशातून वस्तरा काढला आणि नईमच्या गळ्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या नईमला तातडीने रुग्णालयात दाखल केले.

उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कलाम घटनास्थळावरून पसार झाला. तो साथीदारासोबत पश्चिम बंगालला पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती फरासखाना पोलिसांना मिळाली. त्यानुसार पुणे रेल्वे स्थानक परिसरातून दोघांना रात्री उशिरा ताब्यात घेतले.

Protected Content