जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील आव्हाणे गावाजवळील मरीमाता मंदिराजवळून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या डंपरवर तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी गुरुवार, १३ जुलै रोजी दुपारी सव्वा दहा वाजेच्या सुमारास डंपरचालक व मालक यांच्याविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावातून डंपरव्दारे वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलिसांना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी बुधवारी रात्री ११ वाजता गावातील मरिमाता मंदिराजवळ सापळा रचला व वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई केली. या कारवाईत चालकाकडे वाळू वाहतुकीचा कुठलाही परवाना नसल्याचे समोर आले, तर दुसरीकडे चालक न थांबता डंपर घेवून पळून गेला, याप्रकरणी गुरुवारी तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचारी पोलीस नाईक किरण आगोणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन तालुका पोलीस ठाण्यात डंपरवरील चालक आणि मालक अशा दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल फेगडे हे करीत आहेत.