धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “ज्येष्ठांचे विरंगुळा केंद्र म्हणजे केवळ एक इमारत नसून, ती आपुलकी, माया आणि जिव्हाळ्याची जागा आहे. या पिढीचा संघर्षमय आणि प्रेमळ जीवनप्रवास आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिला आहे. तुमच्या अनुभवांचं आणि आशीर्वादाचं मोल अनमोल आहे. तुमच्या चेहऱ्यावरच्या प्रत्येक सुरकुतीत संघर्ष, जिद्द आणि प्रेमाची एक कथा दडलेली आहे. आज तुम्हाला आयुष्याच्या संध्याकाळी आनंदाने फुलण्यासाठी एक सुंदर विरंगुळा मिळावा, याच उदात्त हेतूने आम्ही हे केंद्र उभारले आहे,” असे भावस्पर्शी उद्गार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काढले. ते धरणगाव नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या विरंगुळा केंद्राची चावी ज्येष्ठ नागरिकांना प्रदान करण्यात आली. याप्रसंगी करमुक्त बचत गट उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला बचत गटांचा सन्मान देखील करण्यात आला.
यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील यांनी महिला बचत गटांना व्यापारी संकुल उभारणीसाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा केली. “बचत गटांच्या माध्यमातून महिलांना लखपती दीदी बनवण्याचा आमचा निर्धार आहे. महिला केवळ बचत गट चालवत नाहीत, तर त्या संपूर्ण कुटुंबाचा, समाजाचा आणि शहराचा आर्थिक कणा मजबूत करत आहेत,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. धरणगावातील २५० बचत गटांमधील अडीच हजार कुटुंबांना या उपक्रमामुळे जगण्याचे बळ मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. यंदाच्या वर्षी ११७ महिला बचत गटांनी ५० लाख रुपयांहून अधिक कर भरणा करून शहराच्या आर्थिक शिस्तीचा आदर्श घालून दिल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नगरविकास विभागामार्फत खास बाब म्हणून ७८ लाख रुपयांचा निधी मंजूर करून धरणगावात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, संरक्षक भिंत, ओपन जिम, वॉकिंग ट्रॅक व विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती दिली. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्रात नगरपरिषदेच्या फंडातून वातानुकूलित यंत्र (AC) आणि मोठा दूरदर्शन संच (TV) बसवण्याचे निर्देश दिले.
या विरंगुळा केंद्रात ज्येष्ठांना वाचनासाठी वर्तमानपत्रे, विविध पुस्तके, खेळण्यासाठी कॅरम, चेस, चालण्यासाठी वॉकिंग ट्रॅक आणि ओपन जिमची सोय असेल. यासोबतच दररोज योगासने व व्यायामवर्गाचे आयोजन केले जाईल. आरोग्य शिबिरे, सरकारी योजनांची माहिती आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमही येथे नियमितपणे आयोजित केले जातील. या केंद्राचे व्यवस्थापन स्वतः ज्येष्ठ नागरिकच करतील, असे आश्वासन मुख्याधिकारी रामनिवास झवर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक किरण पाटील यांनी केले, तर आभार कार्यालयीन अधीक्षक भिकन पारधी यांनी मानले. कार्यक्रमाच्या अखेरीस बचत गटातील महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रत्येक महिलेला स्टीलचे भांडे आणि घरासमोर लावण्यासाठी झाडाचे रोप भेट म्हणून देण्यात आले.
याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते डी.जी.पाटील, सुभाषअण्णा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्ञानेश्वर महाजन, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. अकलाडे, मुख्याधिकारी रामनिवास झवर, महिला समुदाय संघटक पुष्पा सैंदाणे, सीमा माळी, दिपाली साळुंखे, नूतन सोनवणे, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व सदस्य, माजी गट नेते पप्पू भावे, उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील, शहर प्रमुख विलास महाजन, धीरेंद्र पुर्भे, भाजपाचे संजय महाजन, कैलास माळी सर, दिलीप महाजन, विजय महाजन, ललित नेवे, चंदन पाटील, भालचंद्र जाधव, वाल्मिक पाटील, बाळू येवले, कन्हेया रायमुलकर, संतोष सोनवणे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी आणि बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.