जळगावात अग्रवाल समाजाचा वधू-वर परिचय मेळावा (व्हिडिओ)

WhatsApp Image 2020 01 12 at 7.50.09 PM

जळगाव,प्रतिनिधी | मला नोकरीदेखील करायचीय, मला व्यवसाय करणारा नवरा हवाय, मला स्वातंत्र्य देणारा, माझ्या विचारांचा आदर करणारा नवरा हवा अशी इच्छा मुलींनी तर मला नोकरदार, समजून घेणारी, कौटुंबिक एकता ठेवणारी बायको हवी असा मुलांचा सूर अग्रवाल समाजाच्या विवाहेच्छूक वधू-वरांच्या परिचय मेळाव्यात पहावयास मिळाला.

श्री अग्रवाल नवयुवक मंडळातर्फे रविवारी खान्देशस्तरीय अग्रवाल समाजाचा  वधू-वर परिचय मेळावा घेण्यात आला. मेळाव्याचे उदघाटन अग्रवाल नवयुवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दीपप्रज्वलन करून केले. मेळाव्यात सकाळपासून परिचय सत्र सुरु झाले. विवाहेच्छूक  मुलगा व मुलगी यांनी मंचावर येत त्यांच्या आवडी निवडी आणि इतर वैयक्तिक माहिती दिली. यावेळी सभागृहात विवाहेच्छूक मुला-मुलींनी एकमेकांशी समोरासमोर बसून चर्चा देखील केली. एकमेकांचा स्वभाव, विचार, आवडीनिवडी, भविष्यातील प्लॅनिंग, कौटुंबिक रचना याविषयी एकमेकांना विचारले जात होते. अनेकांमध्ये वैचारिक मतभेद दिसले, मात्र अनेकांचे सूरदेखील जुळताना मेळाव्यात दिसत होते. यावेळी शहरातील अनेक मान्यवरांनी भेटी देत श्री अग्रवाल नवयुवक मंडळाच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कुठलाही सत्कार, भाषणे झाली नाहीत. विवाह आयुष्यभराचे पवित्र बंधन आहे. त्यामुळे एकमेकांशी चर्चा करूनच विवाहेच्छूक वधू वरांनी विवाहाचा निर्णय घ्यावा असा विधायक हेतू ठेवण्यात आला होता. मेळाव्यात धुळे, नंदुरबार, पुणे, नाशिक, मुंबई, नागपूर, अकोला, कोल्हापूर, अहमदनगर, नांदेड, बुलढाणा, बीड या जिल्ह्यांसह राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, गोवा या राज्यातील विवाहेच्छूक वधू वर पालकांसह उपस्थित होते. या मेळाव्याला जळगाव जिल्हा अग्रवाल संघटन, अग्रवाल महिला मंडळ, धुळे अग्रवाल समाज बायोडाटा बँक, नंदुरबार जिल्हा अग्रवाल समाज या संघटनांचे सहकार्य लाभले. मेळावा यशस्वीतेसाठी अध्यक्ष मनीष अग्रवाल, सचिव हितेश अग्रवाल, पूनम अग्रवाल, राहुल अग्रवाल, अमित अग्रवाल, रुपेश अग्रवाल, महेश अग्रवाल, शाम अग्रवाल, जितेंद्र अग्रवाल, प्रशांत अग्रवाल, मनिष मित्तल, गोपाल अग्रवाल, किसन मित्तल आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content