कुत्रा आडवे आल्याने भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा दुदैवी मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसी कंपनीत काम आटोपून घरी निघालेल्या तरूणाच्या दुचाकीसमोर कुत्रा आडवे आल्याने दुचाकी दुभाजकावर आदळल्याने कुसुंबा येथील दुचाकीस्वाराचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी ७ जुलै रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे कुसुंबा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात नोंद करण्यात आली आहे. गौरव उर्फ गणेश घनश्याम सोनार (वय-२६) रा. कुसुंबा ता.जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.

नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, गौरव सोनार हा तरूण आई व बहिण यांच्यासोबत वास्तव्याला होता. एमआयडीसीतील एका कंपनीत तो कामाला होता. नेहमीप्रमाणे रविवारी ७ जुलै रोजी १० वाजेच्या सुमारास जळगावकडून कुसुंबा येथे जाण्यासाठी दुचाकीने निघाला. त्यावेळी कुसुंबा गावाजवळील विमानतळसमोरील रस्त्यावर अचानक कुत्र आडवे आल्याने त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला. त्यात दुचाकी दुभाजकावर आदळल्याने गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घरातील कर्तापुरूष गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात नोंद करण्यात आली आहे. सोमवारी ८ जुलै रोजी सकाळी १० वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Protected Content