पहाण येथील ४६ वर्षीय शेतकरी अज्ञात क्रुझरच्या धडकेत ठार

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील पहाण येथील ४६ वर्षीय शेतकऱ्यास भडगाव रोडवरील हॉटेल भाग्यलक्ष्मी गार्डनजवळ अज्ञात क्रुझरने धडक दिल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज रोजी घडली असून या घटनेप्रकरणी अज्ञात क्रुझर चालकाविरुध्द पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, “पहाण ता. पाचोरा येथील शेतकरी प्रमोद दत्तु पाटील (वय – ४६) हे आज शनिवार, दि. १८ जून रोजी सकाळी मोटरसायकलने चाळीसगाव येथे बैलजोडी बघण्यासाठी गेले होते. दरम्यान चाळीसगावहुन पाचोऱ्याकडे येत असतांना हॉटेल भाग्यलक्ष्मी गार्डन समोरील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरुन निघाले असता पाचोऱ्याकडून भडगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात क्रुझरने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने प्रमोद पाटील हे खाली पडून त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले.

प्रमोद पाटील यांना तात्काळ रुग्णवाहिका चालक बबलू मराठे यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी प्रमोद पाटील यांना मृत घोषित केल्यानंतर शवविच्छेदन केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अज्ञात क्रुझर चालकाविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मयत प्रमोद पाटील यांच्या पश्चात्य वृद्ध आई, वडिल, पत्नी, एक भाऊ, एक बहिण, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. अतिशय मनमिळाऊ व हसमुख स्वभावाचे प्रमोद पाटील यांच्या अकस्मात निधनाने पहाण गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!