मुक्ताईनगर प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून लागून असणारा सस्पेन्स अखेर संपला असून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची विधानपरिषद सदस्यत्वासाठी शिफारस करण्यात आल्याचे वृत्त असून खुद्द त्यांनी देखील याला दुजोरा दिला आहे.
भाजपचे मातब्बर नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला त्याच वेळेस ते राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार बनणार असल्याची चर्चा सुरू होती. अर्थात, १२ नावांची यादी सादर करण्यात थोडा विलंब झाला. राज्यपाल उमेदवार निवडीच्या बाबतीत हस्तक्षेप करतील असे गृहीत धरून महाविकास आघाडीने अतिशय काळजीपूर्वक उमेदवारांच्या नावांची यादी तयार करून आज सायंकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली. यात राष्ट्रवादीच्या कोट्यातून एकनाथराव खडसे यांच्या नावाचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, खुद्द एकनाथराव खडसे यांनी या वृत्ताला दुजोरा देत, आपण या नामनिर्देशनाचे स्वागत करत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे अर्थातच, ते विधानपरिषदेवर जाणार असल्याचे निश्चीत झाले आहे. तर याबाबत आता अधिकृत घोषणेची प्रतीक्षा केली जात आहे. एकनाथराव खडसे हे एक वर्षाच्या राजकीय विजनवासाच्या नंतर राजकारणात पुन्हा सक्रीय होणार आहेत. यामुळे साहजीकच मुक्ताईनगर हे पुन्हा एकदा राजकारणाचा केंद्रबिंदू बनणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
खालील व्हिडीओत पहा या वृत्ताचे विवरण.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3665156843540786