जळगाव (प्रतिनिधी)। जळगाव क्रिकेट लीग अर्थात जेसीएल टी20च्या संघांमध्ये जेसीएलचा पहिला विजेता होण्यासाठी चुरस वाढलेली आहे. आज चौथ्या दिवशी संपन्न झालेल्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये रायसोनी अचिव्हर्स व एम.के. वॉरियर्स संघाने विजय मिळविला. रायसोनी अचिव्हर्सचा खेळाडू सचिन चौधरी व एम.के.वॉरियर्सचा खेळाडू शुभम नेवे हे सामनावीराचे मानकरी ठरले. खान्देश ब्लास्टर्स, मॉटेल कोझी कॉटेज स्ट्रायकर्स, रायसोनी अचिव्हर्स व एम.के. वॉरियर्स यांच्यामध्ये आता उद्या सेमी फायनलचा सामना रंगणार आहे. जेसीएलचा पहिला विजेता कोण होणार याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे. जेसीएल टी20 ला बेन्झो केम, सातपुडा ऑटोमोबाईल, आय केअर ऑप्टिकल, कांताई नेत्रालय, दाल परिवार, पगारिया बजाज, मकरा एजन्सीज, कोठारी ग्रुप नमो आनंद, फ्रुटुगो, हिरा रोटो पॉलिमर्स, भंडारी कार्बोनिक यांचे सहकार्य लाभले आहे.
सहा दिवसात एकूण पंधरा सामने होणार
जेसीएलमध्ये सहा दिवसात एकूण पंधरा सामने होणार आहेत. तिसर्या दिवशी रात्री उशिरा संपन्न झालेल्या तिसर्या सामन्यामध्ये रायसोनी अचिव्हर्स संघाने एम.के. वॉरियर्स संघाचा पराभव केला. एम.के. वॉरियर्स संघाने प्रथम फलंदाजी करीत 20 षटकात 6 बाद 117 धावा केल्या. प्रत्युत्तरात खेळतांना रायसोनी अचिव्हर्सच्या संघाने 7 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 121 केल्या. रायसोनी अचिव्हर्स तर्फे आदित्य बागडदे याने सर्वाधिक 39 चेंडूमध्ये 7 चौकारांच्या साहाय्याने 45 धावा करणारा केल्या. कैलास पांडे याने 23 धावांचे योगदान दिले. आदित्य बागडदे हा सामनावीराचा मानकरी ठरला.
आजचा असा रंगला सामना
चौथ्या दिवशी संपन्न झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये रायसोनी अचिव्हर्स संघाने वनीरा ईगल्स संघाचा 15 धावांनी पराभव केला. टॉस सुनील महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. टॉस जिंकुन प्रथम फलंदाजी करतांना रायसोनी अचिव्हर्स संघाने 8 बाद 146 धावा केल्या. त्यात सचिन चौधरीने 22 चेंडूमध्ये 4 चौकार व 3 षटकारांच्या साहाय्याने ताबडतोब 44 धावा केल्या. अशफाक पिंजारीने 29 (2 चौकार व 1 षटकार) व रोहित तलरेजाने 27 धावांचे (2 चौकार व 2 षटकार) योगदान दिले. वनीरा ईगल्स तर्फे वरुण देशपांडे, अमिन पिंजारी, लिलाधर खडके यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरात खेळतांना वनीरा ईगल्सचा संघ निर्धारीत 20 षटकात 8 बाद 131 धावाच करु शकला. वरुण देशपांडे याने 24 चेंडूमध्ये 2 चौकार व 2 षटकांराच्या मदतीने सर्वाधिक 30 धावा केल्या. रोहित पारधीने 27 धावांचे योगदान दिले. रायसोनी अचिव्हर्स तर्फे सचिन चौधरीने 4 षटकात 25 धावा देत 3 बळी घेतले. चारुदत्त नन्नवरेने 2 गडी बाद केले. अष्टपैलू कामगिरी करुन आपल्या संघाला सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवून देणारा सचिन चौधरी सामनावीराचा मानकरी ठरला.
दुसरा सामना एम.के. वॉरियर्स विरुद्ध के.के. थंडर्स यांच्यात झाला. टॉस आनंद पब्लिकेशन्सचे जितेंद्र कोठारी यांच्या हस्ते करण्यात आला. के.के. थंडर्सने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 20 षटकांमध्ये 9 बाद 143 धावा केल्या. प्रद्युम्न महाजनने 45 चेंडूमध्ये 4 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 56 धावा केल्या. राहुल जाधवने 12 चेंडूंमध्ये 2 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने ताबडतोब 26 धावा केल्या. एम.के. वॉरियर्स तर्फे राहुल निंभोरेने 3 षटकांमध्ये 26 धावा देत 4 गडी बाद केले. तसेच अंकित पटेलने 4 षटकांमध्ये 34 धावा देत 3 गडी टिपले. प्रत्युत्तरात खेळतांना एम.के. वॉरियर्सच्या संघाने 144 धावांचे आव्हान 19.4 षटकात पूर्ण केले. शुभम नेवेने एकाकी लढा देत व नाबाद राहत 69 चेंडूंमध्ये 9 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 70 धावा केल्या. तनेश जैन ताबडतोब फलंदाजी करत 16 चेंडूंमध्ये 3 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 33 धावा करुन आपल्या संघाला सेमिफायनलमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी हातभार लावला. के.के. थंडर्स तर्फे रोहित पाटील 2 तर अमेय कोळीने 1 गडी बाद केला. एम.के. वॉरियर्सच्या विजयचा शिल्पकार शुभम नेवेला सामनावीराचा सन्मान मिळाला. शेवटचे वृत्त हाती येई पर्यंत चौथ्या दिवसाचा दिवसाचा तिसरा सामना स्पेक्ट्रम चॅलेंजर्स विरुद्ध सिल्व्हर ड्रॉप हेल्दी मास्टर्स यांच्यात रंगला होता.
उद्या सेमी फायनल
शनिवार 16 मार्च 2019 रोजी जेसीएल टी 20 चे सेमी फायनलचे दोन सामने होणार आहेत. त्यामध्ये पहिला सामना दुपारी 3 वाजता रायसोनी अचिव्हर्स विरुद्ध मॉटेल कोझी कॉटेज स्ट्रायकर्स यांच्यामध्ये खेळविला जाणार आहेत. दुसरा सामना सायंकाळी 7.15 वाजता खान्देश ब्लास्टर्स विरुद्ध एम.के. वॉरियर्स यांच्यात रंगणार आहे. जिल्ह्यातील क्रिकेटला चालना देणे हा जेसीएलचा मुख्य उद्देश आहे. खेळाडूंना आपल्याच शहरात संधी उपलब्ध करुन देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जेसीएलचे आयोजन करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे त्याला आंतरराष्ट्रीय स्वरुप देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यामुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील नागरीकांनी उत्तम क्रिकेट बघण्यासाठी, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जेसीएल बघायला मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे.