मुंबई । संघाच्या दसरा मेळाव्यातील सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाचे कौतुक करत शिवसेनेने भाजपवर आज हल्लाबोल केला आहे. ‘माय मरो आणि गाय जगो’ हे आपले हिंदुत्व नसल्याचे सांगत त्यांनी हिंदुत्वाच्या प्रकरणी भाजपची दुटप्पी भूमिका असल्याचाही आरोप केला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असणार्या दैनिक सामनामध्ये आज मोहन भागवत यांच्या नागपुरातील भाषणावर स्तुतीसुमने उधळण्यात आली आहेत. यात म्हटले आहे की, दसर्याच्या निमित्ताने दोन मेळावे गाजले. पहिला नागपूरचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वार्षिक विजयादशमी मेळावा, दुसरा अर्थातच मुंबईतील शिवसेनेचा दसरा मेळावा. कोरोनामुळे दोन्ही मेळावे बंद सभागृहांत झाले, पण मेळाव्यांच्या प्रमुख सूत्रधारांनी मांडलेले हिंदुत्वाबाबतचे विचार देशभर पोहोचले आहेत. दोन्ही व्यासपीठांवरील भाषणे म्हणजे सडेतोड तोफखानेच ठरले!
सरसंघचालक मोहन भागवत यांनी दसरा मेळाव्यात हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट करून सांगितली आहे. संघाच्या दृष्टिकोनातून हिंदुत्वाचा अर्थ व्यापक असून पूजा पद्धतीशी जोडून त्याला संपुचित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हिंदुत्व हे देशाच्या स्वत्वाचे सार असल्याची भूमिका श्री. भागवत यांनी मांडली. शिवतीर्थावरील मेळाव्यात (वीर सावरकर स्मारकाच्या सभागृहातील) मुख्यमंत्र्यांनी भाजपातील हिंदुत्वाच्या राजकीय ठेकेदारांना सुनावले आहे की, हिंदुत्व म्हणजे काय ते सरसंघचालकांकडून शिका. यावर पुढे जाऊन श्री. ठाकरे यांनी खडसावले आहे की, घंटा बडवणं, थाळ्या पिटणं हे आमचं हिंदुत्व नाही. त्याने काही होत नाही.
यात पुढे म्हटले आहे की, मुख्यमंत्री ठाकरे यांनी मारलेला हा टोला राजभवनाला अस्वस्थ करणारा आहे. भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व गोमातेच्या भोवती फिरते आहे व त्यातून देशात मोठा खूनखराबा झाला. वीर सावरकरांचे गाईबाबतचे मत वेगळे होते. गाईला ते हिंदुत्वाचे प्रतीक मानायला तयार नव्हते. गाय हा एक उपयुक्त पशू पिंवा प्राणी आहे एवढेच त्यांचे मत, पण भाजपातील हिंदुत्ववाद्यांनी गाईवरून हिंदू-मुसलमानांत दंगली भडकवल्या व राजकारण केले. ‘माय मरो आणि गाय जगो’ हे आमचे हिंदुत्व नाही. महाराष्ट्रात गोमाता आणि गोव्यात जाऊन खाता? हेच का तुमचे हिंदुत्व? असा टोकदार भालाच उद्धव ठाकरे यांनी भाजपला खुपसला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था आहे. त्यामुळे सरसंघचालक काय सांगतात ते अनेकदा दिशादर्शक ठरते. संघाचा हिंदू विचार कधीच लपून राहिला नाही. अयोध्येत राममंदिर व्हावे ही संघाची भूमिका होतीच, पण ‘कोरोना’ महामारीची पर्वा न करता सर्व मंदिरे खुली करा, असे श्री. भागवत कधीच सांगणार नाहीत. मंदिरांत गर्दी झाली तर महामारीचे संकट वाढेल असे त्यांचे म्हणणे असल्याचे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.