चीनच्या हेरगिरीचा महत्वाचा खुलासा

पाटणा (बिहार): वृत्तसंस्था । भारतातील चीनच्या हेरगिरीचा महत्वाचा खुलासा झाला आहे. पंतप्रधान कार्यालयासह , दलाई लामा आणि भारतात लावण्यात आलेल्या सुरक्षा उपकरणांवर देखील चीनी गुप्तहेरांचे लक्ष होते.

भारतातील मंत्रालयामध्ये काम करणाऱ्या उच्चाधिकारी आणि नोकरशहांबाबत माहिती गोळा केली जात असल्याची माहिती पकडण्यात आलेल्या हेरांच्या चौकशीत उघड झाली आहे.

चीनने भारतातील हेरांच्या पथकाला पंतप्रधान कार्यालयासह मोठ्या कार्यालयांमधील आतली माहिती गोळा करण्याचे काम दिले होते, अशी माहिती चीनी हेर क्विं शीच्या चौकशीत उघड झाली आहे. कार्यालयात कोणती व्यक्ती सर्वात महत्वाची आहे, कोण कोणत्या पदावर कार्यरत आहे आणि तो किती प्रभावी आहे, अशी माहिती गोळा करण्याबाबत सांगण्यात आले होते.

चौकशीत चीनी हेरांच्या या पथकात महाबोधी मंदिरातील एक प्रमुख बौद्ध भिक्षु आणि कोलकात्यातील एका महिलेचा समावेश असल्याचे स्पष्ट होत आहे. क्विंग शी आणि या महिलेची भेट घडवून आणली गेली होती. ही महिला शीला महत्वाचे कागदपत्रे देत असे. शी ही कागदपत्रे चीनला रवाना करत असे.

चीनी हेराच्या चौकशीत काही दस्तावेज सापडले आहेत. पंतप्रधान कार्यालयातील एक अधिकारी आणि दलाई लामा यांच्या सर्व कार्यक्रमांची माहिती मिळवली जात होती. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने गेल्या महिन्यात क्विंग शी याच्यासह त्याचा नेपाळी साथीदार शेर बहादूर आणि भारतीय पत्रकार राजीव शर्मा यांना अटक केली होती. हे तिघेही तिहारच्या तुरुंगात आहेत.

भारतात हेरगिरी करण्यासाठी या चीनी गुप्तहेराला चीन दरमहा एक लाख रुपये देत होता. ज्या दक्षिण दिल्ली भागात शी राहात होता, त्या घराचे भाडे दरमहा ५० हजार रुपये होते. हे भाडे कोण भरत होते याचा तपास केला जात आहे.

Protected Content