नरसिंहपूर: वृत्तसंस्था । मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातही दलित महिलेवर सामूहिक बलात्कार झाला पीडित महिला ४ दिवस तक्रार दाखल करण्यासाठी कुटुंबीयांसोबत पोलिस ठाण्याच्या पायऱ्या झिजवत राहिली, पोलिसांनी पीडितेलाच शिवीगाळ करत पैसे मागितले. नंतर निराश पीडितेने फाशी घेत आत्महत्या केली.
हा गुन्हा चर्चेत आल्यानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक आणि उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याचे आदेश दिले. एफआयआर दाखल करून न घेणाऱ्या पोलिस ठाण्याच्या प्रभाऱ्याविरोधात तक्रार नोंदवून त्याला अटक करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
ही संतापजनक घटना २८ डिसेंबरला घडली. नरसिंहपूरमधील रिछाई गावात राहणारी दलित महिला शेतात गवत कापण्यासाठी गेली होती. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या तीन आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तक्रार नोंद करण्यासाठी गोटिटोरिया चौकी व चीचल पोलिस ठाण्यात गेलो असता पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही, असे पीडित महिलेच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
पोलिसांनी दिलेल्या वागणुकीला कंटाळून शेवटी पीडित महिलेने आत्महत्या केली.पोलिसांनी प्रथम पीडित महिलेला वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी पीडित महिला वैद्यकीय रिपोर्ट घेऊन पोलिस ठाण्यात गेली असता तिच्या कुटुंबीयांना ठाण्यातच बसवून ठेवण्यात आले. नंतर पीडितेला शिवीगाळ करण्यात आली आणि पैसे दिले तर कुटुंबीयांना सोडून देऊ असे पोलिसांनी सांगितल्याचा पीडित कुटुंबीयांचा आरोप आहे. पोलिसांनी आमच्याच विरोधात कलम १५१ अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची पीडितेचे पती आणि सासऱ्यांची तक्रार आहे.
महिलेच्या आत्महत्येनंतर सामूहिक बलात्काराची ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. तर, एक आरोपी फरार आहे.