जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिव कॉलनी उड्डाण पुलाजवळ असणारे एसबीआयचे एटीएम फोडून तब्बल १४ लाख ४१ हजारांची रोकड लंपास करणार्यांच्या मुसक्या जिल्हा पेठ पोलिसांनी आवळल्या आहेत.
याबाबत वृत्त असे की, याबाबत वृत्त असे की, शिवकॉलनी रेल्वे उड्डाण पुलाच्या अलीकडे स्टेट बँकेची शाखा आहे. याच्या बाहेर एक एटीएम सेंटर आहे. त्यात कॅश भरणा आणि एटीएम अशी दोन एटीएमची मशीन आहेत. १२ जुलै रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हे दोन्ही एटीएम तोडले असल्याचे या परिसरातील रहिवाशांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. यात संबंधीत एटीएम हे गॅस कटरने तोडून चोरट्यांनी यामध्ये असणारी १४ लाख ४१ हजार रूपयांची कॅश लांबवून पोबारा केल्याचे स्पष्ट झाले होते. तर या एटीएममध्ये असणारी सात लाख रूपयांची रोकड मात्र चोरट्यांना न दिल्याने सुरक्षित राहिली होती.
दरम्यान पोलीसांनी बँकेने लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता. यात तीन जण तोंडाला रूमाल बांधून मध्यरात्री १ वाजून ५५ मिनीटांनी दाखल झाले. दोन्ही एमटीएम गॅस कटरने फोडून रोकड घेवून तीने चोरटे २ वाजून ३३ मिनीटांनी एटीएमच्या बाहेर पडले. यावेळी सोबत चारचाकी गाडी असल्याची माहिती समोर आली होती. भर वस्तीमधील एटीएम फोडून तब्बल १४ लाखांची रक्कम लंपास करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली होती. या संदर्भात पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली होती.
निसार सखू सैफी (वय ३९) व इरफान सखू सैफी (वय २९, दोघे रा.साफेता, ता.गणपूर, हरियाणा) असे अटकेतील दोघांची नावे आहेत. हे दोघे सख्खे भाऊ आहेत. तर कुर्शीद मदारी सैफी (वय ३७, रा.अंघोला हतीम, पलवल, दिल्ली) हा मास्टर माइंड पळून गेला आहे. कुर्शीद हा निसार व इरफान यांच्या मोठ्या भावाचा शालक आहे. इरफान गावाकडे वेल्डिंगचे काम करतो. तर कुर्शीद व निसार हे ट्रकचालक आहेत. कुर्शीदरच्या विरुद्ध एटीएम फोडल्याचे काही गुन्हे यापूर्वीच दाखल आहेत. दरम्यान, लॉकडाऊन काळात हे तिघे ट्रान्स्पोर्टच्या एक कंटेनरवर काम करीत होते. साधारणपणे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ते कंटेनरमध्ये (एमएन-०१, एडी- ८८१६) कोलकात्याहून भिवंडीला गेले. दोन दिवसांनी पुन्हा कोलकाता गेले. यानंतर मालकाने पुन्हा एकदा तिघांना माल घेऊन मुंबईला पाठवले. या वेळी जळगावातून जात असताना कुर्शीद याने शिव कॉलनीतील महामार्गालगतचे एटीएम फोडण्याचा प्लॅन केला होता. त्यासाठी त्याने आधीच एक गॅसकटर खरेदी करून कंटेनरमध्ये ठेवले होते. ठरल्यानुसार ११ जुलै रोजी दुपारी ते मुंबईतून निघाले. रात्री १२ वाजेच्या सुमारास मालेगावजवळ एका ढाब्यावर जेवण करून जळगावच्या दिशेने निघाले. मध्यरात्री शिव कॉलनी स्टॉपवर पोहोचल्यानंतर त्यांनी काही अंतरावर कंटेनर उभा करून इरफान व कुर्शीद हे दोघे एटीएम केंद्रात गेले. दोघांनी गॅसकटरच्या मदतीने मशीन कापून रोकड काढली. गाडी पुसण्याच्या एका कापडात सर्व रक्कम गंुडाळून दोघे काही मिनिटांतच पुन्हा कंटेनरमध्ये येऊन बसले. या वेळी निसार जागा झाला होता. यानंतर तिघेजण कोलकात्याच्या दिशेन निघून गेले. दरम्यान, १२ जुलै रोजी सकाळी सात वाजता हा प्रकार उघडकीस आला. तोपर्यंत तिघेजण कंटेनरसह महाराष्ट्राच्या बाहेर निघून गेले होते. दरम्यान, यातील कुर्शीद याने जळगावात येण्यापूर्वी हरियाणा राज्यात अशाच प्रकारे काही गुन्हे केले आहेत. पोलिस त्याच्या मागावर होते. चार दिवसांपूर्वी कुर्शीद, निसार व इरफान तिघेजण कंटेनरने हरियाणा-उत्तर प्रदेशच्या बॉर्डरवर होते. या वेळी हरियाणा पोलिसांनी त्यांना गाठले. पोलिस मागावर असल्याचे समजताच मास्टर माइंड कुर्शीद मात्र पळून गेला. तर निसार व इरफान यांनी जळगावातील एटीएम फोडल्याची कबुली दिली. या दोघांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पहिल्यांदाच केले चोरीचे धाडस अन् अडकले पोलिसांच्या जाळ्यात
या घटनेत कुर्शीद हाच मास्टर माइंड आहे. इरफान गॅस वेल्डिंगचे काम करतो तर निसार ट्रकचालक आहे. निसार याने दोन्ही भावांना यूट्यूबवरील एटीएम केंद्र फोडण्याचे व्हिडिओ दाखवले. आपण सहजपणे लाखो रुपये मिळवू शकतो, असे त्यांच्या डोक्यात भरवले. तसेच इरफानच्या अंगी असलेल्या वेल्डिंगच्या कलेचा उपयोग चोरीसाठी होऊ शकतो, असेही सांगितले. त्यानुसार दोघे भाऊ तयार झाले होते. त्यांनी पहिल्यांदाच चोरी केली अन् पोलिसांच्या जाळ्यातही अडकले.
यांनी केली कारवाई
जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ पंजाबराव उगले, अपर पोलीस अधिक्षिका भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम, जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांच्या सुचनेनुसार एपीआय दिलीप शिरसाठ, सपोनि भटू नेरकर, पो.कॉ. जितेंद्र सुरवाडे, शेखर पाटील, शेखर जोशी, फिरोज तडवी, पोलीस मुख्यालयातील चालक अजय चौधरी, तुषार जावरे, अजित पाटील, नाना तायडे, अविनाश देवरे, प्रशांत जाधव, हेमंत तायडे यांनी कारवाई केली.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/577465812887743