शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळण्यात घोळ; भाजपची चौकशीची मागणी

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या भरपाईच्या वितरणात घोळ होत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या संदर्भात चौकशी करण्याची मागणी भाजपतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन नुकसान भरपाईच्या वितरणातील घोळाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले असून त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणी मध्ये सापडला आहे.

तत्कालीन महाराष्ट्र मधील भाजप सरकारने शेतकर्‍यांच्या नुकसानीपोटी हेक्टरी आठ हजार रुपये प्रमाणे अनुदान मंजूर केले व निधी उपलब्ध करून दिला आहे. शासकीय यंत्रणेमार्फत त्यांचे वितरण करायचे होते परंतु या यावल तालुक्यांमध्ये निधी वितरण करताना बराच घोळ झालेला आहे. या निधी वाटपात नाव एका यादीत तर खाते नंबर दुसर्‍याचा असे प्रकार झाले आहेत. तसेच आजपर्यंत साधारण दोन हजार १०० शेतकर्‍यांना निधी मिळालेला नसून आपल्या कार्यालया कडून माहिती घेतली असता निधी हा मुदतीच्या आत प्रशासनास परत पाठविला आहे. त्यामुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना विनाकारण तहसील कार्यालय फिरावे लागत आहे.

शेतकर्‍यांना मिळणारा निधी कशासाठी परत पाठवण्याची घाई करण्यात आली ? असा प्रश्‍न उपस्थित करून अनुदान वाटपामध्ये हलगर्जीपणा केलेल्या कर्मचार्‍यांची चौकशी करून संबंधित कर्मचारी तहसीलदार यांची चौकशी होऊन कारवाई करावी. अन्यथा यावल तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे पंधरा दिवसांनी आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

Protected Content