जळगाव प्रतिनिधी । आपल्या पोलीस अधिक्षकपदाच्या कार्यकाळात जनतेसह सामाजिक संघटनांचे चांगले सहकार्य मिळाल्याची भावना बदली झालेले पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी व्यक्त केल्या. ते पोलीस खात्यातर्फे देण्यात आलेल्या निरोप समारंभात बोलत होते.
जिल्हा पोलिस दलातर्फे सोमवारी डॉ. उगले यांना बदली झाल्यामुळे निरोप देण्यात आला. या वेळी व्यासपीठावर अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, विभागीय पोलिस अधिकारी गोरे उपस्थित होते. या वेळी डॉ. उगले म्हणाले की, जळगाव जिल्हा संवेदनशील आहे. अनेक प्रकारचे गुन्हे येथे घडत असतात. अशात मी पदभार घेतल्यानंतर येथे अधिकार्यांची पदे रिक्त होती. तशाच परिस्थितीत काम सुरू केले. गंभीर गुन्हे घडल्यानंतर स्थानिक पोलिस अधिकार्यांनी दिलेल्या माहितीवर अनेक प्रश्न त्यांना विचारले. यातून नवीन माहिती समोर येऊन गुन्ह्यांची उकल होण्यास मदत झाली. यासाठी नागरिक व सामाजिक संघटनांचे आपल्याला प्रेम मिळाले असल्याचे डॉ. उगले यांनी आवर्जून नमूद केले.
याप्रसंगी पोलीस अधिकार्यांनी डॉ. उगले यांच्यासोबत काम करण्याचे अनुभव आपल्या मनोगतातून कथन केले.