भाजपच्या ताब्यातील चार बाजार समित्यांवर प्रशासक

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील जामनेर, चाळीसगाव, पाचोरा व अमळनेर या भाजपच्या ताब्यात असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त करण्यात आल्या असून त्यांच्यावर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सध्या जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मुदत संपलेली आहे. यातील महाविकास आघाडीकडे असणार्‍या बाजार समित्यांना मुदवाढ मिळणार असल्याचे संकेत आधीच मिळालेले आहेत. तर दुसरीकडे राज्य शासनाने अमळनेर, चाळीसगाव, जामनेर व पाचोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त करून तेथे प्रशासकांची नियुक्ती केली आहे. विशेष बाब म्हणजे चारही ठिकाणी भाजपचे सभापती व उपसभापती होते. यातील जामनेरात गिरीश महाजन, चाळीसगावात उन्मेष पाटील तर अमळनेरात स्मिता वाघ यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांचे समर्थक बाजार समित्यांवर असतांना आता यावर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आल्याने यामागे राजकारण असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

तर दुसरीकडे राज्य शासनाच्या या निर्णयाच्या विरूधात संबंधीत मंडळी न्यायालयात दाद मागण्याची शक्यता देखील आहे. पारोळा, यावल, रावेर या तीन बाजार समित्यांना मुदतवाढ मिळाली असतांना यानंतर चार समित्या बरखास्त केल्याने आता सहकारातील राजकारण तापणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content