अबु धाबी-चेन्नई सुपरकिंग्स (सीएसके) ने आयपीएलच्या 13 व्या सीजनच्या ओपनिंग मॅचमध्ये मुंबई इंडियंसला 5 विकेट्सने पराभूत केले.
अबु धाबीमध्ये झालेल्या सामन्यात मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 162 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करणाऱ्या सीएसकेने 19.2 ओव्हरमध्येच 5 विकेट्स गमावून 166 धावा करत सामना आपल्या नावे केला.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी चांगली सुरूवात केली होती. पण रोहित (१२) झेलबाद झाला. पाठोपाठ क्विंटन डी कॉकही माघारी परतला. ५ चौकारांसह त्याने २० चेंडूत ३३ धावा केल्या. सौरभ तिवारी आणि सूर्यकुमार यादव यांच्यात चांगली भागीदारी होत होती, पण तो १७ धावांवर बाद झाला. दमदार फलंदाजी करणारा सौरभ तिवारीदेखील ३१ चेंडूत ४२ धावा करून बाद झाला. हार्दिक पांड्याने केवळ १४ धावा केल्या. कृणाल पांड्याही ३ चेंडूत ३ धावा करून बाद झाला. पोलार्ड १८ धावांवर माघारी गेला. नंतर पॅटिन्सनदेखील ११ धावांवर बाद झाला. त्यामुळे मुंबईला २० षटकात ९ बाद १६२ धावांपर्यंतच मजल मारता आली.
१६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अनुभवी आणि धोकादायक शेन वॉटसन ५ धावांवर माघारी परतला. पाठोपाठ मुरली विजयही पायचीत झाला. मलिंगाच्या जागी संघात स्थान मिळालेल्या जेम्स पॅटिन्सनने अवघ्या एका धावेवर त्याला बाद केले. शेन वॉटसन (५) आणि मुरली विजय (१) हे दोघे स्वस्तात बाद झाल्यावर अंबाती रायडू आणि फाफ डु प्लेसिस या जोडीने चेन्नईला सावरलं. अनुभवी अंबाती रायडूने संयमी खेळ करत ३३ चेंडूत दमदार अर्धशतक झळकावले. अतिशय भक्कम अशी डु प्लेसिस-रायडू यांची भागीदारी अखेर राहुल चहरने तोडली. रायडू ७१ धावांवर झेलबाद झाला. जाडेजाही १० धावांत बाद झाला. त्यानंतर डु प्लेसिसने नाबाद राहत विजयी चौकार मारला. त्याने नाबाद ५८ धावा केल्या.