अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल फेऱ्या वाढवल्या

मुंबई : वृत्तसंस्था । अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकलच्या विशेष फेऱ्या सोडण्यात याव्यात, अशी विनंती महाराष्ट्र सरकार सातत्याने रेल्वे मंत्रालयाकडे करत होतं. त्या मागणीची दखल घेऊन पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे या तिन्ही मार्गांवर सध्या विशेष लोकल चालवल्या जात आहेत. या लोकलसेवेमुळे खूप मोठा दिलासा प्रवाशांना मिळत आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्याने सध्या ज्या विशेष लोकल धावत आहेत त्या कमीच पडत आहेत. प्रामुख्याने पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी आणि सायंकाळी विशेष लोकलमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ही बाब लक्षात घेऊन ही गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने फेऱ्यांची संख्या वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या दररोज साडेतीनशे विशेष लोकल धावतात. मात्र, सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन व्हावे व गाड्यांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून विशेष लोकलची संख्या ३५० वरून आता ५०० करण्याचा निर्णय झाला आहे. २१ सप्टेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. वाढीव दीडशे लोकलपैकी ३० लोकल सकाळी व २९ लोकल संध्याकाळी गर्दीच्या वेळेत चालवल्या जाणार आहेत. .

सामान्य प्रवाशांसाठी सध्या लोकलचे दरवाजे बंद आहेत. १ सप्टेंबरपासून नवी नियमावली लागू होत असताना मुंबईतील लोकलसेवा पूर्ववत करण्यात येईल, अशी चर्चा होती मात्र राज्य सरकारने त्याबाबत कोणतीही उत्सुकता दाखवली नाही. मुंबई व आसपासच्या उपनगरांत गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. हा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकार लोकलसेवा पूर्ववत सुरू करण्याची रेल्वेकडे मागणी करेल अशी शक्यता तूर्त तरी दिसत नाही.

Protected Content