युरोप खंडात कोरोनाची दुसरी लाट

लंडन: वृत्तसंस्था । कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे युरोपमध्ये पुन्हा एकदा लॉकडाउनचे निर्बंध लावण्यात आले आहेत. संसर्ग पुन्हा वाढत असल्यामुळे स्पेन, फ्रान्स आणि ब्रिटनमधील काही भागांमध्ये लॉकडाउनचे निर्बंध लावले आहेत. मागील काही दिवसांपासून युरोपीय देशांमध्ये बाधितांची संख्या वाढत आहे.

स्पेनच्या अधिकाऱ्यांनी राजधानी माद्रिदमधील काही भागांमध्ये संसर्गाला नियंत्रित ठेवण्यासाठी लॉकडाउन जाहीर केला आहे. सोमवारपासून हा लॉकडाउन सुरू होणार आहे. माद्रीद भागात आठ लाख ५० हजारांहून अधिक लोकांवर निर्बंध येणार आहेत. प्रवास आणि सामाजिक कार्यक्रम आदींवर निर्बंध येणार आहेत.

 

महासाथीच्या पहिल्या टप्प्यात युरोपमध्ये विषाणूमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांमध्ये स्पेनचा समावेश होता. स्पेनमध्ये आता बाधितांची संख्या सहा लाख २५ हजार ६५१ वर पोहचली आहे. माद्रिद आणि आसपासच्या परिसरात संसर्गाचे सरासरी प्रमाण दुप्पट असल्याची माहिती स्पेन सरकारने दिली.

 

हिवाळ्यात महासाथीची दुसरी लाट येण्यापूर्वी युरोपीयन देशांकडून तयारी सुरू आहे. फ्रान्समध्येही बाधितांची वाढ झाली आहे. अर्थमंत्री ब्रूनो ले मेयर यांनादेखील संसर्ग झाला आहे. मार्सेली आणि नीससह अनेक शहरांमध्ये कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. फ्रान्समध्ये मागील काही दिवसांपासून दरदिवशी काही सरासरी १० हजार बाधित आढळत आहेत. कामाच्या ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे.

ब्रिटनमध्ये दुसरी लाट ‘अपरिहार्य’ असल्याचा इशारा पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिला. उत्तर इंग्लंडमध्ये लॉकडाउनचे कडक निर्बंध लादण्यत आले आहेत.

झेक प्रजासत्ताक देशातही निर्बंध लागू करण्यात आले आहे. बार आणि रेस्टोरंट्स, नाइट क्लबस हे रात्री १२ ते सकाळी ६ दरम्यान बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याशिवाय, १० पेक्षाही अधिकजणांना एकत्र येण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. नेदरलँड्समध्येही दोन व्यक्तींमध्ये १.५ मीटरचे अंतर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. घरातही वावरताना १.५ मीटरचे अंतर राखावे अशी सूचना सरकारकडून देण्यात आली आहे.

Protected Content