महापौरांच्या मताला किंमत नाही का : तनुजा तडवी यांचा सवाल

जळगाव प्रतिनिधी । स्वत: महापौर भारतीताई सोनवणे यांचा कचर्‍याच्या ठेक्याला विरोध असतांनाही हा ठेका दिला गेल्याने त्यांच्या मताला काहीच किंमत नाही का ? असा खडा सवाल माजी महापौर तनुजा तडवी यांनी केला आहे. त्यांनी विद्यमान सत्ताधार्‍यांवर जोरदार टीकस्त्र सोडले आहे.

माजी महापौर तनुजा तडवी यांनी अलीकडच्या काळात सक्रीय भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने त्यांनी आता महापालिकेतील विद्यमान सत्ताधार्‍यांना धारेवर धरले आहे.

महापालिका निवडणुकीच्या जाहिरनाम्यात सफाईचा ठेका पद्धत बंद करण्याची घोषणा करणार्‍या भाजपने मात्र सत्तेत आल्यानंतर तब्बल ७५ कोटींचा ठेका दिला आहे. त्यामुळे सत्ताधार्‍यांच्या करणी व कथनीत फरक पडल्या दावा माजी महापौर तनुजा तडवी यांनी केला आहे. महापौर भारती सोनवणेंचा ठेक्याला विरोध असतानाही त्यांच्या मताला किंमत नाही का? असा प्रश्‍न त्यांनी विचारला आहे. तर महापौर या विषयी गंभीर असतील तर त्यांनी अधिकार वापरून सभेत चर्चा घडवून आणण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, निवडणुकीदरम्यान भाजपने आरोग्य व स्वच्छता यासंदर्भात दोन वचन जाहिरनाम्यात प्रसिद्ध केले होते, परंतु तसेच काहीच झालेले नसल्याचा आरोप केला आहे. मनपा सभागृह व सभागृहाबाहेर या ठेक्यांसंबंधी भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत; परंतु सत्ताधारी व प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. उलट बंद ठेका पुन्हा सुरू केला आहे. ठेकेदार जणू पालिकेचा जावई आहे, अशा पद्धतीने सवलती दिल्या. ठेकेदारामार्फत साफसफाईचा घाट घालणे हे मोठे गौडबंगाल असल्याचा आरोप तडवींनी केला आहे. तनुजा तडवी यांनी अलीकडेच शहरातील व्यापारी, उद्योजकांना मालमत्ता करात सूट देण्याची मागणी केली होती. यानंतर त्यांनी थेट सत्ताधार्‍यांवर केलेले शरसंधान लक्षणीय मानले जात आहे.

Protected Content