मुंबई । सोशल मीडीयाचा वापर मुंबई व महाराष्ट्राच्या बदनामीसाठी करण्यात येत असून सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधिशांनी समाजमाध्यमांबाबत केलेले भाष्य हे चिंतनीय असल्याचे प्रतिपादन आज शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असणार्या दैनिक सामनामध्ये सोशल मीडियाबाबत भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, सध्या जमाना सोशल मीडियाचा आणि त्यावर सुरू असणार्या धुमाकुळाचा आहे. त्याला ना निर्बंध ना मर्यादा. सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती रामण्णा यांनी नेमक्या याच मुद्द्यावर बोट ठेवत न्यायाधीशांच्या मनातील खंत बोलून दाखवली आहे. रामण्णा जे म्हणाले ते खरेच आहे आणि थोडयाफार फरकाने ही स्थिती आज सर्वच क्षेत्रांची आहे. हे प्रकार पूर्वीपासूनच सुरू आहेत. फक्त त्याची व्याप्ती मर्यादित होती. जो काही ङ्गमीडियाफ होता तो आतासारखा सोशल नव्हता. त्यामुळे गॉसिप किंवा कुजबुज मर्यादित असे. पुढे दूरदर्शन, नंतर वृत्तवाहिन्या, मनोरंजन वाहिन्या यांचे पेवच फुटले आणि चौकटीत राहणार्या गॉसिपलाही पाय फुटले. मागील पाच-सहा वर्षांत तर या वाहिन्यांच्या जोडीला सोशल मीडिया आला आणि गॉसिपिंगच्या नावाखाली निंदानालस्तीचे घोडे चौखूर उधळू लागले. त्याला ना निर्बंध ना लगाम. विषय कोणताही असो, सोशल साईटस् आणि सोशल मीडिया क्रिया-प्रतिक्रियांनी गच्च भरलाच पाहिजे असा जणू दंडकच झाला आहे.
यात पुढे म्हटले आहे की, मुंबई आणि महाराष्ट्राची सुनियोजित पद्धतीने बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा पद्धतशीर वापर केला जात आहे. पुन्हा या गॉसिपिंगचा कोणी त्यांच्या पद्धतीने समाचार घेतलाच तर तुमची ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची काळी मांजरे लगेच आडवी जातात. न्या. रामण्णा यांच्या सुरात सरन्यायाधीश शरद बोबडे यांनीही त्यांचा सूर मिसळला आणि या त्यागाची जाण ठेवून न्यायव्यवस्थेचा सन्मान सर्वांनीच ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. सरन्यायाधीशांची अपेक्षा रास्तच आहे. अर्थात रामण्णा यांनी जी खंत व्यक्त केली आहे ती न्यायाधीशांपुरती मर्यादित असली तरी आजकाल गॉसिपिंगला कोणतेही क्षेत्र वर्ज्य नाही. ना क्षेत्राचे बंधन, ना टीकेची मर्यादा. सोशल मीडियावर सक्रिय असणारे सगळेच बेभान आहेत असे नाही, पण बहुतांश मंडळींना कसलेच भान राहत नाही. न्या. रामण्णा यांनी व्यक्त केलेली खंत म्हणूनच महत्त्वाची ठरते. ती समजून घेण्याचा समंजसपणा सोशल मीडियावरील बेलगाम मंडळी दाखवतील का, हाच खरा प्रश्न आहे असे यात म्हटले आहे.