मुंबई प्रतिनिधी । देशात सध्या जो काही खुळचट, बुळचट प्रकार सुरू आहे तो पाहता, देशाला ऑलिंपिकमध्ये ‘पोरखेळ’ या प्रकारात सुवर्ण पदक नक्की मिळणार असा टोला आज शिवसेनेने भाजपला लगावला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असणार्या दैनिक सामनात सध्या सुरू असणार्या स्थितीबाबत भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, मुंबईत मदन शर्मा नामक एका निवृत्त नौदल अधिकार्यावर संतप्त शिवसैनिकांनी हल्ला केला, याचे समर्थन कोणी करणार नाही, त्याचा निषेध व्हायलाच हवा; पण हे जे कोणी निवृत्त अधिकारी महोदय आहेत, त्यांनी राज्याचे लोकनियुक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचे आक्षेपार्ह व्यंगचित्र सोशल माध्यमांवर फिरवून काय मिळवले? घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीचा सन्मान राखा, असे या महोदयांना नौदल सेवेत असताना कोणी शिकविले नव्हते काय? तुम्ही ज्या राज्यात राहता, कमवताय, सुखाने जगताय त्या राज्यातील नेत्यांविषयी काहीही वेडेवाकडे बोलायचे व त्यावर संतापलेल्या कोणी तुमचे मुस्काट फोडले तर त्यास अन्याय, अत्याचार, स्वातंत्र्यावर घाला वगैरे शेलकी विशेषणे वापरून राजकारण करायचे. आश्चर्य असे की, देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह महोदयांनी तातडीने या माजी नौदल अधिकार्याशी फोनवर चर्चा करून त्यांना धीर वगैरे दिला. म्हणजे, जणू काही बाबारे, आपण फार मोठे राष्ट्रीय कार्य केले आहे. परखड सत्य सांगायचेच तर, आज आपण महाराष्ट्राच्या खाल्ल्या ताटात छेद केलात, मुख्यमंत्र्यांचाच अवमान केलात. उद्या मनात आलेच तर राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, विद्यमान लष्करप्रमुख, नौदलप्रमुखांची बदनामी केली तरी चिंता करू नका. तुम्हाला या महान कार्याबद्दल पद्म पुरस्कार किंवा विशिष्ट सेवा पदक देऊन गौरविण्यात येईल. हे असले दळभद्री प्रकार ज्या राज्यात चालविले जातात तो देश जागतिक स्तरावर काय झेप घेणार? असा प्रश्न यात विचारण्यात आला आहे.
यात पुढे म्हटले आहे की, यापुढे हे महाशय जी काही मागणी करतील ती करूद्यात, पण आपल्या सैनिकी पेशाला जागून त्यांनी २० जवानांच्या हत्येस जबाबदार असलेल्या राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्र्यांच्याच राजीनाम्याची मागणी करायला हवी होती, पण सध्या आपल्या देशात जो खुळचट, बुळचट प्रकार सुरू आहे तो पाहता ऑलिम्पिकमध्ये पोरखेळ प्रकारात एखादे सुवर्णपदक हमखास मिळेल. मध्य प्रदेशच्या सुरैना जिल्हयात सत्ताधारी भाजप नेत्याच्या गोळीबारात एक जवान गंभीररीत्या जखमी झाल्याचे वृत्त आहे. हे वृत्त कालचेच आहे. याआधी जळगावात भाजपचेच खासदार उन्मेश पाटील यांनी सीमा सुरक्षा दलाचे जवान सोनू महाजन यांचे राहते घर रिकामे करण्यासाठी प्रचंड दहशत निर्माण केली. खासदार पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सोनू यांच्यावर तलवारीने हल्ला केला. आज माजी नौदल अधिकार्यासाठी रस्त्यावर उतरणारे भाजपचे लोक त्यावेळी सोनू महाजन या माजी जवानाच्या बाजूने रस्त्यावर का उतरले नाहीत? असा प्रश्न यात विचारण्यात आला आहे.
या अग्रलेखात शेवटी नमूद केले आहे की, एका नटीने मुंबईचा, मुंबई पोलिसांचा अवमान केला म्हणून चीड व्यक्त केली. त्यास धमकी मानून तिला वाय-प्लस अशी जोरदार सुरक्षा व्यवस्था हिमाचल व केंद्र सरकारने दिली. या स्त्रीदाक्षिण्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. काय ही कर्तव्यदक्षता! पण हिमाचलातील कांगरा भागात एका विवाहित महिलेवर सात जणांनी सामुदायिक बलात्कार केला. पुन्हा तिला जिवे मारण्याची धमकी दिली. यामुळे दहशतीखाली जगणार्या त्या अबलेस झेड सुरक्षा तेथील मुख्यमंत्र्यांनी, देशाच्या गृहमंत्र्यांनी द्यायलाच हवी होती. तसे का झाले नाही? यावरही गांभीर्यपूर्वक चर्चा राष्ट्रीय पातळीवर झालीच तर बहार येईल! बाकी जास्त काय बोलायचे? काही बोलावे असे सध्या काही उरले आहे काय? असे यात म्हटले आहे.