अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी चौथ्या स्थानावर

मुंबई प्रतिनिधी । जगातील टॉप १० श्रीमंताच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांनी सातव्या स्थानावरून झेप घेत चौथे स्थान मिळवले आहे.

ब्लूमबर्ग इंडेक्सच्या रियल टाईम नेटवर्थअनुसार मुकेश अंबानींकडे ८०.६ अरब डॉलर म्हणजेच जवळपास ५.०३ लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. आता ते फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीच्या जवळ पोहोचले आहेत. झुकरबर्गची संपत्ती साधारण १०२ बिलियन डॉलर इतकी आहे.

ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्स डेटानुसार जानेवारीपासून अंबानी हे या क्रमवारीत १० जागांनी वर चढले आहेत. त्यांनी वॉरन बफे, स्टीव्ह बॉलमर, बर्नार्ड अर्नॉल्ट एलन मस्क, सर्जी ब्रिन आणि लॅरी पेज यांना मागे टाकले आहे. मुकेश अंबानींच्या पुढे सध्या झुकरबर्ग तिसऱ्या स्थानावर, मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक असलेले बिल गेट्स दुसऱ्या स्थानावर तर अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस प्रथम क्रमांकावर आहेत. नुकत्याच प्रसिध्द करण्यात आलेल्या क्रमवारीनुसार मुकेश अंबानी यांनी एलव्हीएमएचच्या बर्नार्ड अर्नॉल्ट अँड फॅमिलीला मागे टाकले.

बर्नार्ड अर्नॉल्ट आता पाचव्या क्रमांकावर आले आहेत. यानंतर बर्कशायर हॅथवेचे वॉरेन बफे सहाव्या स्थानावर आहेत. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्स कोट्याधीशांच्या रियल टाईम संपत्तीची मोजदाद करते.

जागतिक स्तरावर रिलायन्सला सातत्याने मिळणाऱ्या गुंतवणुकीचा फायदा त्यांना मिळत आहे आणि त्यांच्या मार्केट कॅपमध्ये वाढ होत आहे. कंपनीच्या शेअर्सचा भाव २१०० रुपयांपेक्षा जास्त आहे आणि मार्केट कॅपही १४ लाख कोटींपलिकडे गेला आहे. या उंचीवर पोहोचणारी ही पहिलीच भारतीय कंपनी आहे.

Protected Content