सोलापूर, वृत्तसंस्था । राज्यातील धार्मिकस्थळं सुरू करण्याच्या मागणीसाठी उद्या सोमवारी एक लाख भाविकांसह पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मोर्चा काढण्याच्या वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या इशाऱ्याचा राज्य सरकारने धसका घेतला आहे. वंचितच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे येणारी सर्व एसटी सेवा बंद करण्यात आली असून एसटी सेवा बंद करण्याचे आदेशच जिल्हाधिकाऱ्याने दिले आहेत.
कोरोनाच्या नावाखाली सरकारने विनाकारण धार्मिकस्थळं बंद ठेवल्याचा दावा करत वंचितने हे आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे उद्या पंढरपुरात वारकऱ्यांनी गर्दी करू नये आणि त्यामुळे करोना संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. जिल्हाधिकाऱ्याने पंढरपूरमध्ये येणाऱ्या सर्व एसटी सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. विठ्ठल मंदिर परिसरात दहा फूट उंचीचे लोखंडी बॅरेकेटिंग लावण्यात आले आहेत. कुणीही मंदिरात प्रवेश करू नये म्हणून हे बॅरिकेटिंग लावण्यात आले आहेत. मंदिर परिसरासह संपूर्ण पंढरपुरात पोलिसांचा प्रचंड ताफा तैनात करण्यात आला आहे.