भुसावळ प्रतिनिधी । लोकसंघर्ष मोर्चातर्फे बेरोजगारांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला असून आज दुपारी हा मोर्चा जळगावकडे रवाना झाला.
लोकसंघर्ष मोर्चातर्फे बेरोजगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी भुसावळ ते जळगाव लॉग मार्च करत आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावरून हा मोर्चा सुरू झाला. लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे यांच्यासह त्यांचे सहकारी आणि हजारो तरूण यात सहभागी झाले आहेत. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रच नव्हे तर देशातील चार राज्यांमधून बेरोजगार तरूण या मोर्चात सहभागी झाले आहेत. त्यांनी विविध घोषणांच्या माध्यमातून विद्यमान सत्ताधार्यांचा निषेध केला. लोखंडी पूल, जामनेर रोड, नाहाटा कॉलेज चौफुलीमार्गे हा मोर्चा जळगावकडे गेला. आज रात्री हा मोर्चा नशिराबाद येथे थांबणार आहे. उद्या सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा जाऊन जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
ऑल इंडिया रेल्वे अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना रेल्वेमध्ये भरती करा, २० टक्के कोटा त्वरित रद्द करावा, महानिर्मिती, महावितरण, महापारेषण, ऑर्डनन्स फॅक्टरी, महाराष्ट्र एस.टी. महामंडळ येथील अप्रेंटिस विद्यार्थ्यांना कायमची नोकरी द्या, सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा पाच हजार बेरोजगारी भत्ता सुरु करा, सर्व रिक्त शासकीय जागा भरून त्यात कंत्राटी व अनुभवी उमेदवारांना प्राधान्य मिळावे आदी विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. दरम्यान, कोणताही अनुचीत प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त राखला आहे.
पहा : बेरोजगारांच्या आक्रोश मोर्चाबाबतचा व्हिडीओ.