भाजपच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मारेकरी- नाना पटोले

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा –  मध्य प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्यात, असे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ओबीसी आरक्षणावरून महाविकास आघाडीला दोष देणाऱ्या फडणवीसांचा खोटारडेपणा उघड झाला असून भाजपच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मारेकरी असल्याचे स्पष्ट झाले असल्याची  टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

मध्य प्रदेशात भाजपा सरकार  असून तेथे गेल्या १ वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका रखडल्या आहेत.   मध्य प्रदेश सरकार मध्य प्रदेश सरकार ओबीसी आरक्षण संदर्भात डाटा सादर करू शकले नाही. ट्रिपल टेस्ट पैकी दोन चाचण्या सादर केल्या. परंतु तिसरी टेस्ट इम्पिरीकल डाटाशिवाय पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे सर्व जागावर  ओबीसी उमेदवार देऊ शकतात, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले असून ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश देत दोन आठवड्यात मतदानाची माहिती देण्याचे निर्देश मध्य प्रदेश सरकारला दिले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्ष   आरक्षणविरोधी असल्याचे दिसून येत आहे असे कॉंग्रेसचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

मंडल आयोगाने ओबीसींना आरक्षण दिले होते. त्यादरम्यान या आरक्षणाला विरोध करत भाजपाने कमंडल यात्रा काढली होती. केंद्रातील भाजपा सरकारने इम्पिरीकल डेटा न दिल्यामुळेच राज्यात ओबींसीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. वारंवार मागणी करूनही केंद्र सरकारने महाविकास आघाडी सरकारला डेटा दिला नाही त्यामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि महाविकास आघाडीला दोष देणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा खोटारडेपणा उघड झाला असून देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे बोलून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. पाच वर्ष सत्तेत असताना आरक्षण वाचविण्यासाठी काहीही केले नाही. भारतीय जनता पक्षाला फक्त ओबीसी समाजाची मते हवी असल्याचा टोला नाना पटोले यांनी मध्य प्रदेश सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशावर लगावला आहे.

Protected Content