नाशिक वृत्तसंस्था । नाशिक जिल्ह्यातील देवळा-चांदवड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार डॉ. राहुल दौलतराव आहेर यांना करोनाची बाधा झाली आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं कळताच त्यांनी स्वतःला होम कॉरंटाइन करून घेतले आहे.
सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असून, विधिमंडळ सदस्य, मंत्री देखील करोना बाधित होताना दिसून येत आहेत. देवळालीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज आहिरे, विधान परिषदेचे आमदार नरेंद्र दराडे नंतर आता देवळ्याचे आमदार डॉ. आहेर हे देखील पॉझिटिव्ह निघाल्याने मतदारसंघात खळबळ उडाली आहे.
तब्येतीबाबत थोडीशी शंका आल्याने आहेर यांची स्वतःची करोना चाचणी करून घेण्याचे ठरविले. त्यांची शंका बरोबर ठरली. त्यांच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा अहवाल मिळताच त्यांनी मतदारसंघात दौरा करताना आपल्या संपर्कात आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार बंधू भगिनींनी आपली काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे.
करोनाची लागण झालेले आहेर हे जिल्ह्यातील तिसरे आमदार आहेत. यापूर्वी राष्ट्रवादीच्या आमदार सरोज आहेर या करोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं होतं. उपचारानंतर त्या आता बऱ्या झाल्या आहेत. त्यांनतर दोन दिवसांपूर्वी विधान परिषदेचे आमदार नरेंद्र दराडे हे करोना पॉझिटिव्ह आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आहेर यांच्यावरही तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीनं उपचार सुरू करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.