नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोविड, जीडीपी आणि चीनच्या मुद्द्यावर भाजप सरकारने खोटेपणाचाही संस्थात्मक पातळीवर प्रचार केला आहे. भाजपचा हा भ्रम लवकरच तुटेल आणि त्याची मोठी किंमत देशाला मोजावी लागेल, अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.
राहुल गांधी यांनी याविषयी एक ट्विट करत भाजपवर टीका केली. भाजप खोटे बोलण्याचे काम करत आहे. कोरोना व्हायरस, जीडीपी आणि चीन यासारख्या बाबींवर सरकार खोटे बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, सरकार कमी चाचण्या करून आणि मृत्यूविषयी खोटी माहिती देऊन कोरोनावर खोटे बोलत आहे. जीडीपीचे नवीन प्रकारे मूल्यमापन केले जात आहे. चीनच्या बाबतीत, मीडियाला धमकावून खोटे पसरवले जात आहे. लवकरच हा भ्रमाचा भोपळा फुटेल आणि त्याची किंमत भारताला मोजावी लागेल. यासह त्यांनी वॉशिंग्टन पोस्टची एक बातमीही शेअर केली. यामध्ये, कोरोनाची प्रकरणे भारतात दहा लाखांपेक्षा जास्त असतानाही मृत्यू कमी होण्याची बातमी आहे. बातमीत मृतांचा आकडा याबद्दलही संशय व्यक्त केला जात आहे. तसेच राहुल गांधी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा एक व्हिडीओ पोस्ट करत चीन प्रकरणात मोदी सरकारच्या भ्याडपणाची भारताला मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचा आरोप देखील राहुल गांधी यांनी केला आहे.