बामणोद, प्रतिनिधी । यावल तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे असणारे गाव म्हणूनबामणोद गावाची ओळख आहे. गावांत आतापर्यत कोरोना रुग्ण आढळला नव्हता, परंतु, काल एक ७० वर्षीय आजींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावांत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
बामणोद गावाच्या आजूबाजूला असणाऱ्या लहान मोठ्या गावांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झालेला असतांना बामणोद गावात नागरिकांच्या सतर्कतेमुळे कोरोनाचा शिरकाव झालेला नव्हता. पण काल बामणोद बस स्टँड परिसरातील एका ७० वर्षीय वृद्धेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सदर महिला ही बामणोद गावातील पहिली कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती ठरली आहे. या आजींच्या संपर्कातील १४ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच बस स्टॅन्ड परिसर प्रशासनातर्फे सील करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून गावात कोरोना रुग्ण सापडल्यास त्यासंदर्भात प्रशासन किती सज्ज आहे?? अशा प्रश्नांमुळे ग्रामपंचायतीमध्ये विविध नागरिकांच्या तक्रारी आलेल्या होत्या. अशातच आता गावात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. सदर महिला ही काही दिवसांपूर्वी जळगाव येथे एका लग्न समारंभामध्ये सहभागी झाल्याची ही माहिती मिळाली आहे. तेथेच सदर महिलेला विषाणूची लागण झाली की काय असा अंदाज नागरिकांमधून वर्तविण्यात येत आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे असलेले आणि आजूबाजूच्या लहान-सहान गावांचा प्रमुख संपर्क असलेल्या बामणोद गावात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याने बामणोद गावातील नागरिकांसाठी धोक्याची घंटाच समजली जात आहे. यापुढे गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, कारण नसताना घराबाहेर पडणे टाळावे, अत्यावश्यक असल्यास घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावावे असे आवाहन उपसरपंच दिलीप भालेराव यांनी केले आहे.