जळगाव प्रतिनिधी । शहरातील संत मिराबाई नगर येथून दुचाकी चोरणाऱ्या दोन संशयित आरोपींना पाचोरा तालुक्यातून स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. चोरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली असून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जलसंपदा विभागात कनिष्ठ लिपीक म्हणून काम करणारे किसन नामदेव जगताप रा. संत मिराबाई नगर यांची टीव्हीएस ज्यूपीटर गाडी क्रमांक (एमएच १९ सीके ९००५) १९ जून रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे २० रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी किसन जगताप यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी स.फौ. अशोक महाजन, संजय सपकाळे, विजय पाटील, विलास पाटील, सुधाकर अंभोरे, अशरफ, नरेंद्र वारूळे, दत्तात्रय बडगुजर, किरण चौधरी, मुरलीधर बारी यांना गुन्ह्याच्या तपासाकामी रवाना केले.
सराईत गुन्हेगार हे पाचोरा तालुक्यातील असल्याची गोपनिय माहिती एलसीबीला मिळल्यानंतर पाचोरा तालुक्यातील संशयित आरोपी संदीप बापूराव चव्हाण (वय-३०) रा. निभोंरी ता.पाचोरा आणि गोकुळे रामदास राकपसरे (वय-२७) रा. चिंचपूरा ता.पाचोरा यांना ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातील चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे. पुढील तपासाकामी रामानंद नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास रामानंद नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी करीत आहे.