भुसावळ प्रतिनिधी । शहरातील शनि मंदिर वॉर्ड परिसरात रविवारी रात्री चार तरूणांनी हवेत गोळीबार केल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून पोलीसांनी याबाबत तपास सुरू केला आहे.
भुसावळ शहरात काल घरफोडी करणार्या दोन चोरट्यांना अटक करतांना त्यातील एकाकडे असणारे गावठी पिस्तुल खाली पडून फायरिंग झाली होती. सुदैवाने यात कुणी जखमी झाले नाही. यानंतर रविवारी रात्री अकराच्या सुमारास पुन्हा एकदा फायरिंगची घटना घडली. याबाबत प्राप्त माहितीनुसार चार तरूणांचा या भागातील एका व्यक्तीसोबत एकमेकांकडे पाहण्यावरून वाद झाला. यानंतर या तरूणांनी हवेत फायरिंग केले. गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर परिसरातील लोक जमा झाल्यानंतर या चौघा तरूणांनी तेथून पलायन केले. दरम्यान, बाजारपेठ पोलीसांनी याबाबत तपास सुरू केला आहे.