पहूर येथे दारू विक्रेत्यांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी

पहूर ता.जामनेर प्रतिनिधी । शहरातील लेले नगर परिसरात दारू विक्रीच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणात पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहूर पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या लेले नगर भागात सात ते आठ ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून बेकायदेशीररित्या दारू विक्री केली जात आहे. या रस्त्यावरून ये-जा करण्यासाठी नेहमी पोलिसांची वर्दळ असते. हा परिसर वादग्रस्त म्हणून ओळखला जातो. रविवार २१ जून रोजी रात्री ७ ते ७.३० वाजेच्या दरम्यान दारू विक्रेत्यांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. हाणामारीत लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या, दगडाचा वापर करण्यात आला आहे. तसेच महिलांचाही यात समावेश असल्याचे सांगितले आहे.

घटनास्थळी पोलिसांची धाव
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी गेलेले पोलीस कर्मचारी थोडक्यात बचावले आहे. दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. तर त्वरीत दुकाने बंद करण्यात आले होते. यावेळी पहूर पोलीस स्टेशनचे सपोनि राकेशसिंह परदेशी यांच्या पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन यातील दिपक कुमावत, नितीन पांढरे, सचिन पांढरे, सतिश कुमावत, शाम कुमावत या पाच जणांना ताब्यात घेतले असून नितीन पांढरे हे जखमी झाले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Protected Content