सावदा प्रतिनिधी । जुन्या वादाच्या कारणावरून घरात घुसून विवाहितेच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना चिनावल येथे मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी संशयित तरूणाविरोधात सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी भाला उर्फ मुकेश रमेश बारेला (वय-२९) रा. मलगाव कोठा तहसील झिरण्या ता.जि. खरगोन मध्यप्रदेश. ह.मु. चिनावल, कुंभारखेडारोड ता. रावेर या तरूणाच्या पत्नीची संशयित आरोपी भोला मोहाशा बारेला (वय-३८) रा. धुळकोट बोरी ता.झिरण्या ता.जि.खरगोन मध्यप्रदेश रा. चिनावल, कुंभारखेडा रोड ता. रावेर याने १५ दिवसांपुर्वी छेड काढली होती. छेड केल्याप्रकरणी मुकेश याने संशयित भोला याला जाब विचारला होता. त्याचा राग मनात ठेवून फिर्यादी भाला बारेला घरात नसतांना संशयित आरोपी भोला बारेला हातात कुऱ्हाड घेवून मंगळवारी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास घरात घुसन पत्नी ईला मुकेश बारेला (वय-२४) हिला घराबाहेर ओढून जवळील कुऱ्हाडीने डोक्यात वार करून खून केला तर मुलगा कुणाल मुकेश बारेला (वय-८) याला मानेवर कुऱ्हाडीने वार करून जखमी केले. जखमी कुणालच्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी भोला यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि राहूल वाघ हे करीत आहे.