पिंप्राळा परिसरातील ७६ घरकुलांसाठी महापौरांच्या हस्ते सोडत !

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा परिसरात आयएचएसडीपी योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या ७६ घरांसाठी मंगळवारी महापौर भारती सोनवणे व मनपा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. उर्वरीत १४४ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या घरकुलात लाभ देण्यात येणार आहे.

मनपाच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाला महापौर भारती सोनवणे, उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, स्थायी समिती सभापती ऍड.शुचिता हाडा, महिला व बालकल्याण सभापती शोभा बारी, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक सुरेश सोनवणे, कुलभुषण पाटील, नगरसेवक कैलास सोनवणे, चेतन सनकत, नवनाथ दारकुंडे, शहर अभियंता सुनील भोळे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना कनिष्ठ अभियंता चंद्रकांत सोनगिरे यांनी दांडेकर नगरातील झोपडपट्टीतून ५४० घरे उचलण्यात आली होती. त्यांना तात्पुरता स्वरूपात पिंप्राळा हुडको परिसरात जागा देण्यात आली होती. त्याठिकाणी उपलब्ध जागेप्रमाणे ४७२ घरे बसली. घरे ४७२ असल्याने एकाच कुटुंबातील दोन नावे असल्यास एकाचे नाव कमी करण्यात येऊन ४७२ नावे निश्चित करण्यात आली. तात्पुरती जागा देण्यात आलेल्या जागेवरच पुन्हा बांधकाम करावयाचे असल्याने हागणदारीमुक्तीसाठी पुढील व्यक्तींना अगोदर घरे देण्यात आली. आयएचएसडीपी अंतर्गत मंजूर ३२८ घरांपैकी सुरुवातीला २५२ घरे सोडत काढून वाटप करण्यात आली होती. महासभेत ठराव झाल्यानुसार डीपी रस्त्यावरील ८२ नागरिकांची नावे निश्चित करण्यात आली होती त्यापैकी ७६ नागरिकांच्या घरकुलसाठी सोडत काढण्यात येत असल्याची माहिती सोनगिरे यांनी दिली.

इतरत्र मालमत्ता नसल्याचे प्रतिज्ञापत्र घेणार
आयएचएसडीपी योजनेंतर्गत आज ज्या लाभार्थ्यांना घरकुल वाटप केले जाणार आहे त्यांच्याकडून मनपा प्रशासन एक प्रतिज्ञापत्र भरून घेणार आहे. घरकुल मिळालेल्या लाभार्थ्यांच्या नावे भारतात कुठेही मालमत्ता नाही जर मालमत्ता आढळून आल्यास सदर घरकुल जप्त करण्यात यावे अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र लाभार्थ्यांकडून भरून घेण्यात येणार आहे.

१५६ घरांचा डीपीआर तयार
आयएचएसडीपी अंतर्गत तयार करण्यात आलेल्या सर्व घरकुलांचे वाटप आजच्या सोडतीमध्ये संपुष्टात येणार आहे. उर्वरित १४४ लाभार्थ्यांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १५६ घरे तयार करण्यात येणार आहे. १५६ घरांचा डीपीआर मनपाकडून तयार करण्यात आला असून काही दिवसात लाभार्थ्यांची यादी तयार करण्यासाठी नागरिकांचे आधारकार्ड जमा केले जाणा असल्याची माहिती श्री.सोनगिरे यांनी दिली.

Protected Content