जळगावात महेश नवमीनिमित्त रक्तदान शिबिर; विविध स्पर्धांचेही आयोजन

जळगाव प्रतिनिधी । भगवान महेश नवमीनिमित्त शहरात विविध संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिरासह विविध स्पर्धा व वक्त्यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. यावेळी माहेश्वरी समाजबांधवांचा उत्साह दिसून आला.

सध्या कोरोना आजाराने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर रक्ताचा देखील तुटवडा भासत आहे. त्यासाठी महेश नवमीनिमित्त माहेश्वरी समाजातर्फे सकाळी व दुपारी दोन सत्रात रक्तदान शिबिर घेण्यात आले. तत्पूर्वी पांझरापोळ येथे भगवान महेश यांचे स्मरण करीत शिवपिंडीवर अभिषेक करून महाआरती करण्यात आली. अभिषेक हा अंजली-चिरायू मुंगड या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आला. तसेच गोमातेला गुळाची लापशी खाऊ घालण्यात आली.

यानंतर महेश प्रगती मंडळ येथे सकाळी व दुपारी दोन सत्रात समाजबांधवांनी फिजिकल डिस्टनसिंगचे पालन करीत उत्साहाने रक्तदान केले. सकाळी ११५ तर दुपारी ५७ अशा १७२ महिला व पुरुषांनी रक्तदान केले. यासाठी रेडक्रॉस सोसायटी व गोळवलकर रक्तपेढी यांचे सहकार्य लाभले. सभागृह प्रत्येकवेळी सॅनिटाईझ करण्यात येत होता. तसेच प्रत्येकाच्या रक्तदानानंतर चादर बदलवुन सुरक्षितता घेतली गेली. रक्तदात्यांना आधी वेळ देऊन मग बोलविण्यात आले होते. कार्यक्रमासाठी शहर व जिल्हा माहेश्वरी युवा संघटन, महेश प्रगती मंडळ, शहर व तहसील माहेश्वरी सभा, जिल्हा माहेश्वरी सभा, माहेश्वरी महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले.

विविध स्पर्धांचे आयोजन
माहेश्वरी समाजतर्फे विविध स्पर्धादेखील घेण्यात आल्या. यात महिलांनी पारंपरिक वेशभूषा करीत भगवान महेश यांची पूजा केली. चांगल्या वेशभूषेला पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच महिलांसाठी रांगोळी स्पर्धा व लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. रविवारी रात्री यु ट्यूबवर डी.जे. शिवा यांचा भजनाचा कार्यक्रम व माहेश्वरी समाजाविषयी माहिती प्रसारित करण्यात आली. तसेच विविध वक्त्यांचे कोरोना आजार व अर्थव्यवस्था याविषयी मार्गदर्शन घेण्यात आले.

Protected Content