शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । सध्या सुरू असणार्या लॉकडाऊनच्या कालावधीत दिनांक १४ पासून येथील बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवांच्या वस्तूंची दुकाने ही सकाळी ९ ते दुपारी ३ या कालावधीत खुली राहणार आहेत.
येथील व्यापारी असोसिएशनची मंगळवारी तातडीची बैठक घेण्यात आली. याच्या अध्यक्षस्थानी शेंदूर्णी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष तजय अग्रवाल होते. या वेळी बोलताना त्यांनी कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व सोशल डिस्टन्सचे महत्व अधोरेखित करतांना व्यापारी बांधवांनी बैठकीत निर्णय घेतला. शेंदूर्णी नगरपंचायत हद्दीतील जीवनावश्यक सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने दुकाने सध्या दररोज सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वेळात सुरू राहत होती. तथापि, मंगळवारच्या बैठकीत ठरल्यानुसार दिनांक १४ पासून ते २१ पर्यंत किंवा शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत येथील सर्व दुकाने व प्रतिष्ठाने दररोज सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळात खुली राहतील. त्यानंतर वरील वेळे व्यतिरिक्त सर्व दुकाने बंद राहतील या निर्णयाचे पालन करणे सर्व व्यापारी बांधवांना बंधनकारक असून नियम मोडणार्या व्यवसायकांवर दंडात्मक कारवाई करण्याची जबाबदारी शेंदूर्णी व्यापारी असोसिएशनवर टाकण्यात आली आहे. नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास नगरपंचायत प्रशासनाने व्यापारी असोसिएशनचे लक्षात आणून द्यावे असे ठरले असून तसे निवेदन मुख्याधिकार्यांना देण्यात येणार आहे.