कोरोनाच्या आपत्तीसाठी २० लाख करोड रूपयांचे पॅकेज : पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली वृत्तसंस्था । कोरोनाच्या प्रतिकारासाठी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा करत यासाठी २० लाख कोटी रूपयांच्या पॅकेजला पंतप्रधान मोदी यांनी आज जाहीर केले आहे. ते राष्ट्राला संबोधीत करतांना बोलत होते.

पंतप्रधान मोदी हे आज रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार असल्याची माहिती जाहीर झाल्यानंतर ते नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या अनुषंगाने आज मोदी म्हणाले की, कोरोनाचा प्रतिकार करतांना जगाला चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी व्यतीत झाला आहे. या दरम्यान ४२ लाखांना याचा संसर्ग झाला असून पावणे तीन लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही अनेकांचा मृत्यू झाला असून या सर्वांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केली. फक्त एका व्हायरसने जगाला उध्वस्त करून टाकले आहे. जगभरात करोडोंच्या जीवनावर यामुळे संकट आलेले आहे. सर्व जग आपापला बचाव करण्याच्या प्रयत्नात आहे. आम्ही कधी अशा प्रकारचे संकट ना कधी पाहिले होते ना ऐकले होते. मानव जातीसाठी हे अकल्पनीय आहे. हे संकट अभूतपुर्व असले तरी थकणे, हरणे मानवाला मंजूर नाही. आपण सतर्कता बाळगून व सर्व नियमांचे पालन करून आपल्याला बचाव देखील करायचा असून पुढे वाटचाल देखील करायची आहे. यामुळे आपल्याला मजबूतपणे करण्याची आवश्यकता आहे.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, आम्ही गत शताब्दीपासूनच एकविसावे शतक हे भारताचे असल्याचे ऐकत आहोत. कोरोनाच्या संकटाच्या नंतर जगातील स्थितीवर आम्ही निरिक्षण करत आहोत. यामुळे एकविसावे शतक हे भारताचे असेल हे आमचे स्वप्न नसून आमची जबाबदारी देखील आहे. यासाठी आत्मनिर्भर भारत हा एकमात्र उपाय आहे. इतकी मोठी आपत्ती भारतासाठी एक संधी व संदेश घेऊन आलेली आहे. कोरोनाचा प्रकोप सुरू होत असतांना भारतात पीपीई किट बनत नव्हते तर एन-९५ मास्कचे नाममात्र उत्पादन होत होते. आज दोन लाख पीपीई किट व दोन लाख एन-९५ मास्क बनत आहे. आपण आपत्तीला संधीत बदलल्याने शक्य झाले. आज आत्मनिर्भरतेची संकल्पना बदलली आहे. अर्थकेंद्रीत वैश्‍वीकरण विरूध्द मानवकेंद्रीत वैश्‍वीकरणाचा संघर्ष समोर आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, भारताची १३० कोटी लोकसंख्या कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी सक्षम आहे. भारताकडे तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळ असल्याने कोणत्याही परिस्थितीवर आपण मात करू शकतो. आत्मनिर्भर भारताची इमारत ही अर्थव्यवस्था, इन्फ्रास्ट्रक्चर, सिस्टीम, लोकसंख्या आणि मागणी या पाच स्तंभांवर उभी आहे. यासाठी २० लाख करोड रूपयांच्या पॅकेजची घोषणा त्यांनी केली. भारताच्या जीडीपीच्या अंदाजे २० टक्क्यांइतके हे पॅकेज आहे. उद्यापासून अर्थमंत्री जनतेला यातील विविध तरतुदींची माहिती देतील असे पंतप्रधान म्हणाले. गत सहा वर्षात देशात झालेल्या आर्थिक सुधारामुळे आज आपत्तीतही भारताची व्यवस्था अधिक सक्षम व समर्थ असल्याचा दावा त्यांनी केला. या पॅकेजमुळे सर्व क्षेत्रांना प्रोत्साहन मिळणार असून यामुळे अर्थव्यवस्थेला गती येणार आहे.

कोरोनाच्या आपत्तीत लोकलनेच आपल्याला वाचवले आहे. स्थानिक बाजारपेठ, उत्पादन आणि सप्लाय चेन आदींची महत्वाची भूमिका आहे. याच्याच माध्यमातून आपण या प्रकोपाचा सामना करणार आहोत. यामुळे आजपासून प्रत्येक भारतवासी लोकलसाठी ग्लोकल बनायचे आहे. स्थानिक प्रॉडक्ट खरेदी करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. कोरोना हा दीर्घ काळापर्यंत आपल्या जीवनाचा भाग बनणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आम्ही मास्क घालू, दोन गज दुरीचे पालन करू. मात्र आपल्या लक्ष्यापासून दुर होणार आहे. यामुळे लॉकडाऊन ४.० हा पूर्णपणे नव्या स्वरूपात असणार आहे. यात राज्यांकडून मिळणार्‍या सूचनांचा आधार घेतला आहे. याबाबतची माहिती १८ मे आधी दिली जाणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.

Protected Content