एकनाथराव खडसे पक्षांतर करणार की पुन्हा शांत बसणार ?

जळगाव प्रतिनिधी । सध्या कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे राजकारणाशी संबंधीत काहीही निर्णय घेणे योग्य होणार नाही. तथापि, भाजप पक्षश्रेष्ठींनी सातत्याने निष्ठावंतांवर अन्याय केला असून यामुळे समर्थकांनी निर्णय घेण्याची मागणी केली आहे. तर, अनेक पक्षांच्या ऑफर्सदेखील असल्या तरी, लॉकडाऊन नंतर सर्व समर्थकांशी बोलून योग्य तो निर्णय घेणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केले. यामुळे आता तरी ते ठाम निर्णय घेणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भारतीय जनता पक्षाने विधानपरिषदेचे तिकिट नाकारल्याने एकनाथराव खडसे प्रचंड अस्वस्थ बनले आहेत. त्यांच्या समर्थकांनी आता भाजपचा त्याग करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. सोशल मीडियातही यावरून त्यांचे समर्थक आक्रमक झालेले आहेत. या पार्श्‍वभूमिवर, आज एकनाथराव खडसे म्हणाले की, भाजपने आमच्या सारख्या पक्षासाठी आयुष्य अर्पण केलेल्यांना तिकिट नाकारले असले तरी किमान खूप मेहनत करणारे माधव भांडारी, केशव उपाध्ये, मेधा कुलकर्णी यांच्या सारख्यांना तरी तिकिट देण्याची गरज होती. मात्र असे न होता भाजपला विरोध करणार्‍यांना तिकिट दिले गेले आहे. यामुळे पक्षात नाराजीची लाट आहे. या पार्श्‍वभूमिवर, खडसे म्हणाले की, मला काही पक्षांकडून आधीच ऑफर्स आलेल्या आहेत. तथापि, सध्या कोरोना सारख्या भयंकर आपत्तीमुळे लॉकडाऊन सुरू असून ही वेळ राजकीय निर्णय घेण्याची नाही. तथापि, लॉकडाऊन संपल्यानंतर समर्थकांशी सल्ला मसलत करून आपण निर्णय घेणार असल्याचे खडसे स्पष्टपणे म्हणाले.

एकनाथराव खडसे यांनी आजवर पक्षावर अनेकदा जाहीर नाराजी व्यक्त केली असली तरी थेट निर्णय घेण्याचा पवित्रा घेतला नव्हता. त्यांना विधानपरिषदेची अपेक्षा असल्याचे यातून स्पष्ट झाले होते. तथापि, पक्षाने पुन्हा डावलल्याने खडसेंनी आज स्पष्टपणे पक्षांतराचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तथापि, आता तरी ते निर्णय घेणार की फक्त नाराजीच व्यक्त करून स्वस्थ बसणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.

खालील व्हिडीओत पहा : एकनाथराव खडसे यांची विधानपरिषदेत डावलल्या नंतरची प्रतिक्रिया.

https://www.facebook.com/508992935887325/videos/3990995410974130

Protected Content