मुंबई वृत्तसंस्था । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेरील तीन पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. याआधी मातोश्री परिसरातल्या चहावाल्याला करोनाची लागण झाली होती. दरम्यान करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या तीन पोलिसांवर उपचार करण्यात येत आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या या पोलिसांमध्ये कोणतीही लक्षणं दिसून येत नव्हती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कला नगर भागातील सगळ्या पोलिसांनी पुन्हा एकदा करोना चाचणी करण्यात येत आहे.
मुंबईत करोनाग्रस्तांची संख्या ७ हजार ६०० च्या पुढे गेली आहे. तर आत्तापर्यंत एकट्या मुंबईत २९५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वतोपरी काळजी घेण्यात येते आहे. सोशल डिस्टन्सिंग, करोना प्रतिबंधित क्षेत्र, करोनाशी संबंधित चाचण्या वाढवणं हे सगळं केलं जातं आहे. तरीही करोनाचे रुग्ण वाढत आहेत. यावर सरकार आणि मुंबई महापालिका सर्वतोपरी उपाय योजण्याचे प्रयत्न करते आहे.
२२ एप्रिलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या बंगल्यावर तैनात असलेल्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकालाही करोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आले होते. त्यावेळी या सहाय्यक निरीक्षकाच्या संपर्कात असलेल्या सहा जणांना क्वारंटाइन करण्यात आले होते. तर वर्षा बंगल्यावर तैनात असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलचाही करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.