आखाती देशातील भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी नौदलाच्या १४ युध्दनौका सज्ज

नवी दिल्ली वृत्तसंस्था । जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. परीणामी अनेक भारतीय जगातील विविध देशात अडकलेले आहे. भारत सरकाने आखाती देशांतून देशवासीयांना मायदेशात आणण्यासाठी नौदलाच्या १४ युध्दनौका तयार केल्या आहेत. त्यातील चार वेस्टर्न कमांडमध्ये, चार पूर्वेकडील कमांडमध्ये आणि 3 दक्षिणी कमांडमध्ये आहेत, अशी माहिती नौदलाचे व्हाईस अ‍ॅडमिरल जी अशोक कुमार यांनी एका वृत्तवाहीनीशी बोलतांना दिली आहे. आखाती देशांमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आमच्याकडे अनेक युद्धनौका सज्ज असल्याचेही जी. अशोक कुमार म्हणाले.

मुंबईतील आयएनएस आंग्रे येथे एकूण ३८ जणांनाकोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १२ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, तर २ जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती अशोक कुमार यांनी दिली. आमच्या युद्धनौका आणि पाणबुड्यांमध्ये कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही, असेही ते पुढे म्हणाले.

आतापर्यंत भारतात कोरोना विषाणूमुळे १ हजार २१८ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत भारतातील करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होऊन ती ३७ हजार ३३६ वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे, गेल्या २४ तासांत कोरोनाचे २ हजार २९३ नवे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत चोवीस तासांत आढलेल्या रुग्णसंखेच्या तुलनेत ही सर्वाधिक संख्या आहे.

Protected Content