मुंबई प्रतिनिधी । पालघर येथे झालेली दुर्घटना अतिशय निंदनीय असून याला कुणी राजकीय रंग देऊ नये अशी अपेक्षा आज शिवसेनेचे मुखपत्र असणार्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यात दोन साधूंसह तिघांच्या हत्येने प्रचंड खळबळ उडाली असून आज दैनिक सामनात यावर भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, पालघर परिसरात दोन साधूंची जमावाने निर्घृणपणे हत्या केली. या सर्व घटनेचा धिक्कार करावा तेवढा थोडाच! हा सर्व प्रकार म्हणजे महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रकार आहे हे आता उघड होऊ लागले आहे. कारण काही मंडळींनी यासही हिंदू-मुसलमान असा रंग देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. साधूंची हत्या जितकी निषेधार्ह, साधूंचे रक्त सांडणे जितके निर्घृण आणि अमानुष तितकेच अमानुष या प्रकरणास धार्मिक रंग देण्याचे कारस्थान आहे. साधूंवर हल्ला करणारे जितके नराधम आहेत तितकेच नराधम या प्रकरणास जातीय आणि धार्मिक रंग देणारे आहेत. या साधूंना गुजरातमध्ये जायचे होते. कोणी सांगतात, सिल्वासाला जायचे होते, पण हे भगव्या वस्त्रांतील साधू असूनही त्यांना अडवले व परत पाठवले. या साधूंना तेथील प्रशासनाने ताब्यात ठेवून महाराष्ट्र सरकारला कळवले असते तर कदाचित मार्ग निघाला असता, पण तसे घडले नाही व साधूंना प्राण गमवावा लागला.
अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे एक कार्यक्षम मंत्री आहेत. याप्रकरणास धार्मिक रंग देऊन चिथावणी देणार्यायांचे कारस्थान राज्याच्या गृहमंत्र्यांनी हाणून पाडले आहे. ज्यांची हत्या झाली ते व ज्यांनी हत्या केली तो जमाव एकाच धर्माचा आहे. दोन्ही बाजूला हिंदूच आहेत. त्यामुळे धार्मिक रंग देऊ नका असे ठणकावून सांगण्यात आले. मॉब लिंचिंग एक विकृती आहे व या विकृतीचे समर्थन कोणालाही करता येणार नाही. पालघरच्या घटनेनंतर एका विशिष्ट विचारांचे तसेच संस्था आणि संघटनेशी संबंधित लोक बोलू आणि लिहू लागले आहेत. हेसुद्धा खतरनाक आहेत. पालघरजवळ झालेल्या दोन साधूंच्या हत्येने महाराष्ट्राच्या परंपरेस हादरा बसला हे खरे. असा हादरा बसावा म्हणून कोणी हे सर्व घडवले नाही ना? पण त्यातील गुन्हेगारांना कठोर शासन होईल आणि एकही आरोपी सुटणार नाही असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी दिला आहे. आजही महाराष्ट्राचा ग्रामीण भाग अज्ञान, अंधश्रद्धा आणि अफवांच्या जाळयात अडकला आहे. त्यातूनच चंद्रपूर, धुळे आणि डहाणू-पालघरसारख्या घटना घडत आहेत. महाराष्ट्रात साधूंची भगवी वस्त्र रक्ताने भिजली याचे राजकारण कोणी करू नये. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात हिंदू महासभा अध्यक्षाची अलीकडेच गोळया घालून हत्या करण्यात आली. त्यांच्या अंगावरही भगवेच कपडे होते. पालघरची घटना सुन्न करणारी आहे. महाराष्ट्र दुःखात असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.