धुळ्यात ‘कोरोना’ विषाणू तपासणीची उत्तर महाराष्ट्रातील पहिली प्रयोगशाळा

 

धुळे (प्रतिनिधी) धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत (व्हायरल रिसर्च ॲण्ड डायग्नोस्टिक लॅबोरेटरी) ‘कोरोना’ विषाणूच्या तपासणीस सुरवात झाली असून आज दहा नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. अशा प्रकारे ‘कोरोना’ विषाणूची तपासणी करणारी ही उत्तर महाराष्ट्रातील पहिली प्रयोगशाळा ठरली आहे.

 

केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या साथीचे आजार आणि नैसर्गिक आपत्ती यांचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रयोगशाळांचे जाळे स्थापन करण्याच्या योजनेंतर्गत धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात या प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत प्राथमिक सोयीसुविधा, यंत्रसामग्रीची उपलब्धता व कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 1.8 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या प्रयोगशाळेसाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील 200 स्क्वेअर मीटर जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र, ‘कोरोना’ विषाणूची साथ पसरल्यानंतर तातडीची उपाययोजना म्हणून वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागात ‘कोरोना’ विषाणू तपासणीला सुरवात करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेचे ‘COVID 19’ चाचणी प्रयोगशाळा, असे नामकरण करण्यात आले आहे.

 

या तपासणीसाठी ‘आयआरटीपीसीआर’ ही अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध झाली आहे. या प्रयोगशाळेच्या चाचणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेने (NIV) काही नमुने तपासणीसाठी या प्रयोगशाळेत पाठविले होते. या प्रयोगशाळेत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नागसेन रामराजे, विभागप्रमुख प्रा. डॉ. मृदुला द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत संशोधक शास्त्रज्ञ डॉ. गायत्री पोतदार, डॉ. सुप्रिया माळवी, मनीषा तमायचेकर, तंत्रज्ञ पूजा ब्राम्हणे, स्मिता ठाकूर, अनिल यादव, योगेश सोनवणे, अर्जुन वाघ यांनी नमुन्यांची तपासणी करून अहवाल पाठविले.

 

वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेने पाठविलेल्या अहवालांची तपासणी केल्यावर राष्ट्रीय विषाणू संस्थेने या प्रयोगशाळेस ‘कोरोना’ विषाणूच्या नमुन्यांची चाचणी करून अहवाल देण्यास 31 मार्च 2020 पासून परवानगी दिली आहे. पहिल्या दिवशी चार, तर आज दुसऱ्या दिवशी दहा नमुन्यांची तपासणी करण्यात आली. एका वेळेस 92 नमुन्यांची तपासणी करता येते. या चाचणीसाठी सध्या आठ ते दहा तासांचा कालावधी लागत आहे. सरावाने तो सहा तासांवर येईल. यापूर्वी ‘कोरोना’ विषाणूच्या तपासणीसाठी नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत पाठवावे लागत असत. मात्र, धुळ्यातच ही सुविधा उपलब्ध झाल्याने वेळ व पैशांची बचत होईल. ‘कोरोना’ विषाणू तपासणीचे वैद्यकीय महाविद्यालयात 400 कीट उपलब्ध आहेत.आवश्यकतेनुसार त्यांची मागणी नोंदविण्यात येईल. ‘कोरोना’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर नमुन्यांची तपासणी करताना पुरेपूर दक्षता आणि सुरक्षा बाळगली जाते, असेही प्रा. डॉ. द्रविड यांनी सांगितले.

 

‘कोरोना’ विषाणूशी संबंधित नमुने तपासणीमुळे रुग्णांना अहवाल लवकर मिळणार आहे. त्यामुळे रुग्णांवर औषधोपचारही तातडीने होतील. ही प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांचे मार्गदर्शन लाभल्याचे अधिष्ठाता डॉ. रामराजे, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. द्रविड यांनी सांगितले.

 

‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून सुमारे चार कोटी रुपयांचा निधी औषधे व अत्यावश्यक यंत्रसामग्रीच्या खरेदीसाठी उपलब्ध करुन दिला आहे. तसेच आणखी मदत लागली, तर राज्य शासन मदत उपलब्ध करून देईल.

Protected Content