मुंबई (वृत्तसंस्था) करोनाचा प्रादुर्भाव देशभरात वाढतो आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन पुकारला आहे. भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ८७३ झाली आहे. तर आत्तापर्यंत १९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्रातही कोरोनाचा फैलाव सुरूच असून आज सकाळी मुंबईत पाच तर नागपुरात एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. यामुळे राज्यातील रुग्णांचा आकडा आता १५९ वर पोहोचला आहे. शुक्रवारी राज्यात एकाच दिवशी तब्बल २८ रुग्ण आढळले. या रुग्णांत इस्लामपूरमधील बाधित रुग्णांच्या संपर्कातील १५ व्यक्तींचा, तर नागपूरमध्ये गुरुवारी आढळलेल्या रुग्णांच्या चार सहवासितांचा समावेश आहे. मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी २ रुग्ण, तर पालघर, कोल्हापूर, गोंदिया आणि पुण्यात प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. एक रुग्ण गुजरात राज्यातील आहे. आजवर राज्यात २४ कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.