बुलडाणा प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन उपाययोजना करीत आहे. तसेच प्रशासन विषाणूचा प्रसार रोखण्यास सज्ज आहे. जिल्ह्यात विदेशातून आलेल्या नागरिकांचे विलीगीकरण करण्यात येत आहे. त्यानुसार 33 विदेशातून आलेल्या भारतीय नागरिकांना त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले आहे.
यामध्ये चिखली तालुक्यात 11, दे.राजामध्ये 5, खामगांवमध्ये 4, मलकापूरमध्ये 2, जळगांव जामोद 4, लोणार 2, मेहकर 1 आणि सिंदखेड राजा तालुक्यातील 4 नागरिकांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे दुबई येथून आलेले मलकापूर येथील रहीवासी वय 40 वर्ष यांना बुलडाणा जिल्हा सामान्य रूग्णालयात आयसोलेशन कक्षात संशयीत म्हणून दाखल करण्यात आले आहे. त्यांचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. खामगांव येथील आयसोलेशन कक्षात दाखल तीन नागरिकांना कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी दिली आहे.