मुंबई प्रतिनिधी । गत अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असणार्या युतीची आज भाजपचे अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत घोषणा करण्यात आली.
शिवसेनेने सातत्याने भाजपवर टीकास्त्र सोडण्याचा शिरस्ता कायम राखल्यामुळे युती होणार नसल्याची चर्चा मध्यंतरी सुरू झाली होती. मात्र एकीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडी करून लढत असतांना शिवसेना व भाजपने स्वतंत्र लढल्यास याचा या दोन्ही पक्षांना जबर फटका पडणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. अनेक सर्व्हेक्षणांमधून ही बाब अधोरेखीत झाली आहे. या पार्श्वभूमिवर, दोन्ही पक्षांनी एकत्रीतच निवडणुकीला सामोरे जाण्याचे ठरविले आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि उध्दव ठाकरे यांच्यात अलीकडेच युतीबाबत एकमत झाले होते. आज अमित शाह यांच्या मातोश्री भेटीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आज भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या स्वतंत्र बैठका झाल्या. यानंतर अमित शाह हे मुख्यमंत्र्यांसोबत मातोश्रीवर गेले. याप्रसंगी नितीन गडकरी, पियुष गोयल व प्रकाश जावडेकर यांचीही उपस्थिती होती. यानंतर शाह आणि ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत युती झाल्याची घोषणा केली.
वरळीमधील ब्ल्यू सी या हॉटेलमधील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप २५ तर शिवसेना २३ जागांवर लढणार असल्याचे स्पष्ट केले. तर विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांना जागा सोडून उरलेल्या जागा निम्म्या-निम्म्या करण्यात येणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.