जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची पुरती गोची !

जळगाव प्रतिनिधी । आज युतीवर शिक्कामोर्तब झाल्यामुळे जळगाव लोकसभा मतदार संघात दंड थोपटून भाजप समोर उभे असलेल्या शिवसेनेची पुरती गोची झालीय. विशेष करून आर.ओ. पाटील यांच्या राजकीय पुनर्वसाचा प्रश्‍न अधांतरी लटकणार असून जाहीरपणे पंतप्रधान मोदी यांची मिमिक्री करून खिल्ली उडविणारे ना. गुलाबराव पाटील यांना आता मोदींना पंतप्रधान करण्यासाठीच मतं मागावी लागणार आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघात प्रखर भाजप विरोधावर राजकीय आगेकूच करणार्‍या शिवसेनेच्या मातब्बर नेत्यांची युतीमुळे अडचण होणार असल्याचे आता स्पष्टपणे दिसून येत आहे.

आर.ओ. तात्यांचे राजकीय पुनर्वसन अधांतरी

युतीबाबतच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, युती झाल्यामुळे जळगाव लोकसभा मतदार संघात पूर्ण जोशाने तयारी करणार्‍या शिवसेनेची पुरती गोची झाली आहे. मागील साधारण १ वर्षापासून पाचोरा येथील माजी आमदार आर.ओ.पाटील हे लोकसभा लढण्यासाठी पूर्ण तयारीनिशी सज्ज होते. दिवाळीपासून त्यांनी संपूर्ण मतदार संघात शुभेच्छा फलक लावून मतदारांचे लक्ष वेधून घेतले होते. एकंदरीत लोकसभेच्या निमित्ताने शिवसेना आर.ओ.पाटील यांचे राजकीय पुनर्वसन करण्याच्या तयारीत होती. परंतु आता सर्व अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत ए.टी. पाटील यांना (अथवा त्यांच्या जागी असणार्‍या कुणाही दुसर्‍या भाजपच्या उमेदवाराला) शिवसेनेचे नेते पूर्णपणे मदत करतील का? हा प्रश्‍न सर्वात लाखमोलाचा आहे. कारण बहुतांश शिवसेना नेत्यांनी आधीच जाहीरपणे खासदारांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत याचा भलेही उघडपणे नव्हे तर छुप्या पध्दतीत हिशोब चुकता होण्याची हमखास शक्यता आहे. तर यासोबत युतीचा आगामी विधानसभा निवडणुकीवरीही निश्‍चितच परिणाम होणार आहे.

टोकाची लढाई

जळगाव लोकसभा मतदार संघात या मतदार संघात ६ विधानसभा मतदारसंघ येतात. त्यातील भाजपकडे दोन तसेच सहयोगी सदस्य असेलेला एक अपक्ष आमदार आहे. शिवसेनेकडे दोन आमदार आहेत. तर राष्ट्रवादीकडे एक आमदार आहे. भाजपचे राजूमामा भोळे (जळगाव शहर), उन्मेषदादा पाटील (चाळीसगाव), तर सहयोगी सदस्य शिरीषदादा चौधरी (अमळनेर) तर शिवसेनेचे आ. गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण) किशोरअप्पा वाघ (पाचोरा-भडगाव) या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रवादीकडे डॉ.सतीश पाटील (एरंडोल-पारोळा) हे एकमेव आमदार आहेत. या सर्व विधानसभा निहाय बघितले तर सर्व मतदारसंघात शिवसेना व भाजप नेत्यांमध्ये मोठी धुसफूस आहे. पंचवीस वर्ष सत्ता गाजविणारे सुरेशदादा जैन की, गतनिवडणुकीत विजय मिळविणारे राजूमामा भोळे येथूनच जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात आता पुढील उमेदवार कोणाचा म्हणून वादाला सुरुवात होईल. सुरेशदादा जैन आणि एकनाथराव खडसे यांचे वैर अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. जैन यांना जळगावातून पराभूत करून खडसे यांनी मोठा राजकीय हिशोब चुकविला होता. तर अलीकडेच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजप आणि सेना यांच्यातील टोकाची लढाई सर्वांनी अनुभवली आहे. आता युती झाल्यामुळे जळगावचा विधानसभा मतदारसंघ नेमका कुणाला सुटणार ? याची उत्सुकता लागणार आहे.

ना. गुलाबराव पाटील आता कुणावर बाण सोडणार ?

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघात गुलाबराव पाटील व भाजपचे पी.सी.पाटील यांच्यातील वाद सर्वाना माहित आहेत. अगदी हातघाई पर्यंत दोघांचा विषय गेल्याचा इतिहास आहे. तसचं भाजपचे तालुकाध्यक्ष संजय महाजन हे नगरपालिकेतील बदला घेण्यासाठी विधानसभेचीच वाट बघताय. दुसरीकडे स्थानिक शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तर कमालीचा बेबनाव आहे. अनेकदा या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी देखील झाल्या आहेत. दुसरीकडे ना.पाटील यांनी नेहमीच भाजप नेतृत्वावर टीका केली आहे. अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत ना.पाटील यांनी आपले शाब्दिक बाण टोचले आहेत. जळगाव ग्रामीण मतदार संघात युती झाल्यास त्याचा फटका शिवसेनेचे विद्यमान आमदार ना.गुलाबराव पाटील यांना बसण्याची शक्यता आहे. भाजपसोबत युती करून लढणे शिवसेनेला कधीही आवडत नाही. कारण याचा फायदा नेहमीच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराला झाल्याचा इतिहास आहे. परंतु आता भाजप सोबत युती झाल्यामुळे गुलाबराव पाटील यांचे टेन्शन वाढले आहे. कारण भाजपच्या स्थानिक नेत्यांसोबत राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांचे चांगले ट्युनिंग आहे. त्यामुळे स्थानिक भाजप नेत्यांशी कसं जुळवून घ्यायचं? हा मोठा प्रश्‍न ना.पाटील यांना आतापासूनच बैचैन करेल.

एरंडोल-पारोळ्यातही धुम्मस

एरंडोल-पारोळा विधानसभा मतदार संघातील एरंडोल येथे तर शिवसेना-भाजपचे विळा-भोपळ्याचे नाते आहे. या तालुक्यात एकमेकाच्या विरोधावरच दोन्ही पक्षांचे राजकीय अस्तित्व टिकून आहे. एरंडोलचे लोकनियुक्त नगराध्यक्ष भाजपचे मुकुंद परदेशी आहेत. त्यामुळे पालिकेत शिवसेना-भाजप संघर्ष कायमच असतो. या मतदार संघात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील आणि पारोळा येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार हे दोघं जण विधानसभेसाठी तयारी करत होते. यातील मच्छिंद्र पाटील हे पूर्वी शिवसेनेत होते. परंतु चिमणराव पाटील यांच्याशी मतभेद झाल्यामुळेच त्यांनी भाजपात प्रवेश करित विधानसभा लढवली होती. पारोळा तालुक्यात विचार केला तर शिवसेनेचे माजी आमदार चिमणराव पाटील व भाजपचे विद्यमान खासदार ए.टी.नाना पाटील हे एकाच गावाचे रहिवाशी आहेत. त्यामुळे पारोळ्यात त्यांच्यात नेहमीच राजकीय चढाओढ बघायला मिळत असते. गत निवडणुकीच्या वेळी भाजप-शिवसेनच्या संयुक्त मेळाव्यात चिमणराव पाटील यांनी ए.टी.पाटील यांना तोंडावर खडे बोल सुनावले होते. दुसरीकडे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार हे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार डॉ.सतीश पाटील यांचे सख्खे पुतणे आहेत. त्यामुळे लोकसभेला आपण प्रामाणिक मदत केली तरी देखील मच्छिंद्र पाटील,करण पवार व इतर स्थानिक भाजप कार्यकर्ते विधानसभेला आपले काम करतील का? हा प्रश्‍न चिमणराव पाटील यांना अस्वस्थ करेलच.

पाचोर्‍यात इच्छुकांचा हिरमोड

पाचोरा-भडगाव या विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे किशोरअप्पा पाटील हे प्रतिनिधित्व करतात. याठिकाणी देखील शिवसेना-भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये वाद आहे. भाजपचे डी.एम.पाटील यांनी तर काही दिवसांपूर्वीच युती होवो अथवा न होवो पण विधानसभा लढणारच अशी घोषणा करून टाकली आहे. तसचं आमदार किशोरअप्पा पाटील व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात रंगलेला कलगीतुरा अवघ्या जळगाव जिल्ह्याने बघितला आहे. किशोरअप्पा यांनी तर ना.महाजन यांना या मतदारसंघात निवडणूक लढण्याचे आव्हान देखील दिले होते. त्यामुळे ना. महाजन यांचे कट्टर समर्थक अमोल शिंदे हे देखील आ.पाटील यांचे काम कितपत प्रामाणिकपने करतील याबाबत शंकाच आहे. जर नेत्यांचेच जमत नाही तर स्थानिक कार्यकर्ते एकमेकाचे काम कसं करतील. किशोरअप्पा यांनी लोकसभेला काम केले तरी विधानसभेत भाजपचे डी.एम.पाटील हे त्यांच्या समोर आव्हान उभे ठेवणारच आहे. पाचोरा नगरपालिकेत शिवसेना तर पंचायत समितीत भाजप वरचढ आहे. भडगाव नगरपालिकेत भाजप कमकुवत असली तरी पंचायत समितीत चांगली ताकत राखून आहे. एकंदरीत लोकसभेत काम केल्यानंतरही भाजपची मंडळी आपले काम करेल याबाबत आमदार किशोरअप्पा यांना विश्‍वास ठेवणे आजच्या घडीला तर अवघड आहे.

चाळीसगाव-अमळनेरात चित्र अस्पष्ट

चाळीसगाव विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार उन्मेष पाटील आणि शिवसेनेचे स्व.उन्मेषदादा गुंजाळ यांच्यातील राजकीय विरोध जिल्ह्यात खूप गाजलेला आहे. परंतु गुंजाळ यांची मुंबईला हत्या झाल्यानंतर तर आ.उन्मेष पाटील आणि स्व.उन्मेषदादा गुंजाळ मित्र परिवारातील मतभेद टोकाला गेले असल्याचे मानले जाते. गुंजाळ यांनी चाळीसगावमधून विधानसभा लढवून चांगली मते घेतली होती. परंतु त्यांची हत्या झाल्यानंतर आता त्यांचे लहान बंधू या मतदार संघातून अनेक दिवसापासून चाचपणी करताय.परंतु मागील काही काळापासून त्यांनी जनसंपर्क कमी केलेला आहे. एकांदरीत याठिकाणी भाजपचे काम केल्यानंतर देखील शिवसेनेच्या वाट्याला फार मोठे काही लागेल अशी शक्यता कमीच आहे. शिवसेना लोकसभा लढेल या एका आशेवर शिवसैनिक तग धरून होते.परंतु आता ती अशा देखील मावळल्यामुळे लोकसभेसाठी आ.ओ.पाटील यांचा प्रचार करणार्‍या शिवसैनिकांची मोठी राजकीय गोची झाली आहे. अमळनेर विधानसभा मतदार संघात अपक्ष आमदार शिरीष चौधरी हे आहेत. सध्या ते भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. या मतदार संघात शिवसेनेची जास्त ताकद नसली तरी भाजपशी चांगले जुळते अशी देखील स्थिती नाहीय. एकंदरीत या मतदार संघात भाजपचा उमेदवार कोण? यावर देखील शिवसेनेची भूमिका ठरू शकते.

One Response

  1. Sharad Kulkarni

Add Comment

Protected Content