मुंबई (वृत्तसंस्था) आज सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये ३८,६०० अंकांपर्यंत घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही ३४८ अंकांची घसरण झाली. दरम्यान, कोरोना व्हायरसचा जगभरात प्रसार होण्याची भिती असून, त्याचा शेअर बाजारावर विपरित परिणाम झाल्याचे चर्चा आहे.
आज सकाळच्या सत्रात बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात तब्बल १,१०० अंकांची घसरण झाली. टाटा स्टील, टाटा महिंद्रा, बजाज फायनान्स, इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा आणि ओएनजीसीच्या शेअर्समध्ये ५.३१ टक्क्यांची घसरण झाली. अवघ्या काही मिनिटात गुंतवणूकदारांचे तब्बल चार लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. चीनमधून उत्पत्ती झालेल्या कोरोनाव्हायरसचा जगभरात फैलाव होण्याची भिती आहे. असे घडल्यास, त्याचा जागतिक उत्पादन, विकासावर मोठा परिणाम होईल. गुंतवणूकदारांमध्ये त्याच गोष्टीची भिती आहे. त्याचाच परिणाम शेअर बाजारावर होत आहे.